“दोन बॅगा घेऊन आलो…दोन बॅगा घेऊन जाणार... दबावाला झुकणार नाही!” – आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

गांधीनगर अतिक्रमण प्रकरणावर सर्वपक्षीय बैठकीत आयुक्तांची स्पष्ट भूमिका; लवकरच कारवाईचे संकेत

<p>“दोन बॅगा घेऊन आलो…दोन बॅगा घेऊन जाणार... दबावाला झुकणार नाही!” – आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड</p>

कोल्हापूर : गांधीनगर येथील अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यावरून महापालिका प्रशासन आणि सर्वपक्षीय कृती समिती यांच्यातील बैठक चांगलीच तापली. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी “मी कोणाचीही शिफारस घेऊन इथं आलो नाही… दोन बॅगा घेऊन आलो आणि दोन बॅगा घेऊनच जाणार… कोणत्याही दबावाखाली काम करणार नाही,” असा ठाम इशारा देत आपली भूमिका स्पष्ट केली.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गांधीनगरमधील अतिक्रमणांवर महापालिकेने केलेल्या कारवाईचा आढावा घेण्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीने महापौर रुपाराणी निकम आणि आयुक्तांकडे बैठकीची मागणी केली होती. त्यानुसार महापालिकेच्या स्थायी सभागृहात आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. बैठकीत आर. के. पोवार, बाबा इंदुलकर, अशोक देसाई, बाबा पार्टे, अनिल कदम यांच्यासह सर्वपक्षीय कृती समितीच्या सदस्यांनी गांधीनगरमधील अनधिकृत बांधकामांवर तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली. न्यायालयीन आदेशानंतरही कारवाईला विलंब का होत आहे, असा सवाल उपस्थित करण्यात आला.

दरम्यान, आयुक्त डॉ. भारुड यांनी या प्रकरणातील एक योगायोग अधोरेखित केला. “ही केस २०१३ मध्ये सुरू झाली आणि निकाल २०२६ मध्ये लागला. माझ्या सेवेला २०१६ मध्ये सुरुवात झाली आणि मी कोल्हापुरातही २०२६ मध्ये आलो,” असे सांगत त्यांनी हा केवळ योगायोग असल्याचे नमूद केले.

बैठकीदरम्यान काही सदस्यांनी आयुक्तांवर राजकीय दबाव असल्याचा मुद्दाही उपस्थित केला. मात्र, यावर भारुड यांनी “मी कोणाचीही शिफारस घेऊन इथं आलो नाही… दोन बॅगा घेऊन आलो आणि दोन बॅगा घेऊनच जाणार… कोणत्याही दबावाखाली काम करणार नाही,” अशा ठाम शब्दांत उत्तर देत कोणत्याही दबावाला न झुकता कायद्याच्या चौकटीतच कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.