अखिल भारतीय औषध विक्रेत्यांकडून ‘या’ दिवशी देशव्यापी बंदची हाक...

<p>अखिल भारतीय औषध विक्रेत्यांकडून ‘या’ दिवशी देशव्यापी बंदची हाक...</p>

कोल्हापूर - अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने २० मे रोजी देशव्यापी बंद पुकारला आहे. औषध व्यवसाय हा ड्रग अँड कॉस्मेटिक्स अॅक्ट १९४० आणि रूल १९४५ अंतर्गत चालतो. मात्रा, ऑनलाईन औषध विक्री संदर्भात या कायद्यात स्पष्ट तरतूद नाही. केंद्र सरकारने २८ ऑगस्ट २०१८ रोजी ऑनलाईन औषध विक्री संदर्भात नोटिफिकेशन जारी केले होते, मात्र त्याचे अद्याप कायद्यात रूपांतर झालेले नाही. तरीही देशभरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री सुरू असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या संदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल असून न्यायालयाने ऑनलाईन औषध विक्रीला स्थगिती दिली आहे.

कोरोना काळात २६ मार्च २०२० रोजी औषधांच्या होम डिलिव्हरीला तात्पुरती परवानगी देण्यात आली होती. मात्र कोरोना संपून पाच वर्षे उलटल्यानंतरही ही सवलत कायम असल्याने ऑनलाईन कंपन्या त्याचा गैरफायदा घेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. होलसेलर आणि रिटेलर यांना मर्यादित नफा निश्चित करण्यात आलेला असताना, मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या २० ते ५० टक्क्यांपर्यंत सवलत देत अव्यावसायिक स्पर्धा करत आहेत. यामुळे देशातले सुमारे साडेबारा लाख औषध विक्रेते अडचणीत आले असल्याचे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

संघटनेने जीएसआर रद्द करण्याची मागणी केली असून औषध विक्रेत्यांना ब्रँड सब्स्टिट्यूट देण्याचा अधिकार द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. वारंवार निवेदने देऊनही सरकारकडून प्रतिसाद न मिळाल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारत २० मे रोजी देशव्यापी बंद पुकारण्यात आल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील यांनी दिली आहे.

यावेळी उपाध्यक्ष किरण जाधव, सचिव प्रल्हाद खवरे, माजी अध्यक्ष संजय शेटे, दाजीबा पाटील, संचालक महेश सावंत, कैवल्य कुलकर्णी, आदित्य चौगुले, विजय देवणे, अतुल पाटील, पुरुषोत्तम मगदूम आदी उपस्थित होते.