आरटीई अंतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये राखीव जागांच्या प्रवेश प्रक्रियेला आठ तारखेपर्यंत मुदतवाढ

<p>आरटीई अंतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये राखीव जागांच्या प्रवेश प्रक्रियेला आठ तारखेपर्यंत मुदतवाढ</p>

कोल्हापूर - प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीची आरटीई प्रवेशप्रक्रिया राबवण्यात येत आहे.  बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत म्हणजेच आरटीई कायद्यांतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांतील पंचवीस टक्के जागा आर्थिक आणि दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवाव्या लागतात. सहा एप्रिलला प्रवेशासाठीची सोडत काढण्यात आली. त्यानंतर दहा एप्रिलला निवड यादी जाहीर करून निवड यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू करण्यात आले. या प्रक्रियेला आठ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

 या दरम्यान निवड यादीत नाव असलेल्या आणि अद्याप प्रवेश न घेतलेल्या आणखी काही विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे. निवड यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाल्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी देण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला असता ३१५ शाळांतील तीन हजार ३६१ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. यासाठी एकूण तीन हजार ५२८ अर्ज आले होते. यातील दोन हजार ९०० अर्ज निवडण्यात आले होते. यातील दोन हजार १६८ जणांचे प्रवेश निश्चित झालेयत, तर १६ अर्ज नाकारण्यात आले आहेत. अद्याप ७१६ जागांची प्रवेश प्रक्रिया बाकी आहे. पालकांनी त्यांचे कागदपत्र तपासणी लवकरात लवकर करून आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांनी केले आहे.

यंदा राज्यातील ८ हजार ७०१ शाळांमध्ये १ लाख १४ हजार ८२६ जागा प्रवेशासाठी उपलब्ध झाल्या आहेत. त्यासाठी २ लाख ८९ हजार २८६ अर्ज दाखल झाले होते. यातील ७३ हजार ८७५ विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष शाळांमध्ये प्रवेश निश्चित झाले आहे.