जूनपासून राज्यातील सर्व बस स्थानकांवरील स्वच्छतागृहांसाठी एक रुपयाही मोजावा लागणार नाही: परिवहन मंत्र्यांची घोषणा

 

तुम्ही मंत्र्याची फसवणूक करताय का...: मंत्री प्रताप सरनाईकांनी ठेकेदारांना धरले धारेवर

<p>जूनपासून राज्यातील सर्व बस स्थानकांवरील स्वच्छतागृहांसाठी एक रुपयाही मोजावा लागणार नाही: परिवहन मंत्र्यांची घोषणा</p>

<p> </p>

कोल्हापूर - राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान  त्यांनी कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकाला भेट दिली. यावेळी त्यांनी स्वच्छतागृहाच्या ठेकेदारांना धारेवर धरत  एक जून पासून राज्यातील सर्व एसटी बस स्थानकातील स्वच्छतागृहासाठी एक रुपया सुद्धा मोजावा लागणार नसल्याची  घोषणा यावेळी केली.

सुरवातीला त्यांनी पेपर स्टॉल धारकांसोबत संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्याला लागूनच असणाऱ्या कँटीनमध्ये जाऊन  त्यांनी पाहणी केली. यावेळी दरफलकावर चिकटटेप लावल्याचे त्यांच्या निदर्शनाला  आले. त्यांनी ते काढण्याच्या सूचना केल्या. यावेळी दरफलकावरून तुम्ही मंत्र्याची फसवणूक करताय का ? अशा शब्दात त्यांनी कँटीन ठेकेदार इंगळे बंधू यांना झापले.  उद्या पासून याठिकाणी गोरगरीब प्रवाशांसाठी तीस रुपयांत चहा आणि नाष्ट्याचा बोर्ड लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी संपूर्ण बस स्थानक चकाचक असल्याचे पाहून भारावून गेलो असे त्यांनी सांगितले. मात्र मंत्री येणार म्हणून ही स्वच्छता केल्याचे त्यांच्या लक्षात आले, असा त्यांनी खुलासा केला. त्यानंतर त्यांनी  स्वच्छतागृहाची पाहणी केली. या स्वच्छतागृहात पुरुषांना पाच रुपये दर आकारणी तर महिलांना मोफत सुविधा देण्याचा नियम आहे. मात्र याठिकाणी पुरुषाकडून दहा रुपये आणि महिलांकडून सुद्धा रक्कम आकारली जात असल्याचे पाहून त्यांनी संताप व्यक्त करत तुमची दुकानदारी बंद करतो, अशा शब्दात ठेकेदाराला सुनावले. 

यानंतर त्यांनी हिरकणी कक्षाची पाहणी करत याठिकाणी अधिक सेवासुविधा देण्यात याव्यात, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. त्याचबरोबर दर चार तासाला स्थानक स्वच्छ केले जाईल. प्रत्येक बसमध्ये कचरापेटी ठेवण्यात येईल. चालक खोलीत स्वच्छता आणि गरम पाण्याची व्यवस्था करण्यात येईल, अशा घोषणा त्यांनी केल्या. यावेळी विभाग नियंत्रक अभय देशमुख,आगर व्यवस्थापक प्रमोद तेलवेकर, विभागीय वाहतूक अधिकारी अनिल म्हेत्तर, सुरक्षा  अधिकारी भानुदास मदने, विभागीय वाहतूक अधीक्षक अतुल मोरे, स्थानक प्रमुख मल्लेश विभूते यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.