पंचगंगा प्रदूषणाविरोधात शिरोळ तालुका बंद; १२ गावांचा कडकडीत निषेध
शिरोळ : पंचगंगा नदीतील वाढत्या प्रदूषणाच्या निषेधार्थ आज शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड, नृसिंहवाडी, शिरढोण, टाकवडे यांसह सुमारे १२ गावांनी कडकडीत बंद पाळत तीव्र संताप व्यक्त केला. आंदोलन अंकुश संघटनेच्या आवाहनाला नागरिक, व्यापारी आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
इचलकरंजीतील औद्योगिक सांडपाणी थेट पंचगंगा नदीत सोडले जात असल्याचा आरोप करत, नदीचे प्रदूषण रोखण्याची मागणी करण्यात येत आहे. दूषित पाण्यामुळे परिसरात दुर्धर आजारांचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
दरम्यान, काळ्या ओढ्यावर बांध घालण्यासाठी आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चूडमुंगे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते आणि नागरिक ट्रॅक्टरद्वारे भराव घेऊन रवाना झाले. “नदी वाचवण्यासाठी ही लढाई आरपारची आहे,” असा इशाराही यावेळी देण्यात आला.
प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला असून, आज होणाऱ्या काळ्या ओढ्यावरील आंदोलनाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.