कोल्हापूर महापालिकेची अतिक्रमण कारवाई फक्त दिखावा? अतिक्रमण विभागाला "दबंग" अधिकाऱ्याची गरज
कोल्हापूर : शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश महापौर रुपारराणी निकम आणि आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिले असले, तरी प्रत्यक्षात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून केवळ दिखाऊ कारवाई होत असल्याचे चित्र समोर येत आहे.
अतिक्रमण हटवण्यासाठी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती महत्त्वाची असते. मात्र प्रत्यक्ष कारवाईच्या वेळी अधिकारी गैरहजर राहून केवळ कर्मचाऱ्यांना पाठवले जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ही कारवाई प्रभावी न ठरता फक्त औपचारिकता पूर्ण करण्यापुरती मर्यादित राहत असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.
शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर अतिक्रमणांनी अक्षरशः मध्यभाग गाठला आहे. खाऊगाड्या, फेरीवाले आणि इतर अनधिकृत बांधकामांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असतानाही अतिक्रमण विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे.
विशेष म्हणजे, इतक्या उघडपणे अतिक्रमण होत असतानाही ते संबंधित अधिकाऱ्यांना दिसत नाही, ही बाब संशयास्पद ठरत आहे. महापालिका अतिक्रमण विभागावर दरमहा लाखो रुपयांचा खर्च करत असताना प्रत्यक्ष कारवाई मात्र बोटावर मोजण्याइतकीच होत असल्याचे वास्तव आहे. यामुळेच आता या विभागाला खऱ्या अर्थाने “दबंग” आणि जबाबदार अधिकाऱ्याची गरज असल्याची मागणी जोर धरत आहे. अन्यथा अतिक्रमणमुक्त शहराचे स्वप्न केवळ कागदावरच राहणार, अशी भीती व्यक्त केली जात आहे.