प्रभाग समिती सभापतीपदी चार जणांची बिनविरोध निवड

<p>प्रभाग समिती सभापतीपदी चार जणांची बिनविरोध निवड</p>

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक 1 ते 4 च्या सभापतीपदी अनुक्रमे वैभव अविनाश कुंभार, अनुराधा सचिन खेडकर, संजय मोहिते व विशाल शिवाजी चव्हाण यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली.

उपजिल्हाधिकारी संपत खिलारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत या निवडी जाहीर करण्यात आल्या. प्रभाग समिती क्रमांक 1 (गांधी मैदान), क्रमांक 2 (छत्रपती शिवाजी मार्केट), क्रमांक 3 (राजारामपुरी जगदाळे हॉल) आणि क्रमांक 4 (छ. ताराराणी मार्केट) या विभागीय कार्यालयांसाठी सभापती पदाकरिता प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला होता.

बैठकीच्या प्रारंभी अर्जांची छाननी करून सर्व अर्ज वैध असल्याचे घोषित करण्यात आले. त्यानंतर माघारीसाठी 15 मिनिटांचा अवधी देण्यात आला; मात्र प्रत्येक ठिकाणी एकमेव उमेदवार असल्याने चारही उमेदवारांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

निवडीनंतर उपमहापौर रुपाराणी निकम, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, उपसभापती दिपा ठाणेकर, गटनेते मुरलीधर जाधव, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक व अधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित सभापतींचे अभिनंदन केले.