मध्यवर्ती बसस्थानक परिसरात रिक्षाचालकांचा मनमानी कारभार; प्रवाशांची लूट
कोल्हापूर : शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात रिक्षाचालकांचा मनमानी कारभार वाढत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. बसस्थानकाबाहेर रिक्षांच्या तीन-तीन रांगा लावून मुख्य रस्ता अक्षरशः बंद केला जात असून, यामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत आहे. मात्र, याकडे वाहतूक पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी काही रिक्षाचालकांकडून “बुलाव डाव” सुरू असून, बसस्थानकात येणाऱ्या प्रवाशांना जबरदस्तीने रिक्षात बसवण्याचे प्रकार घडत आहेत. यामध्ये ठराविक अंतरासाठी जादा भाडे आकारले जात असल्याचेही समोर आले आहे.
गेल्या महिन्यातील एका घटनेत, बसस्थानकातून सुब्राय हॉटेलपर्यंत नेण्यासाठी प्रवाशांकडून तब्बल ६० रुपये आकारण्यात आले. प्रत्यक्षात हे अंतर कमी असतानाही जादा पैसे घेतल्याचे लक्षात येताच संबंधित प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.
स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी या प्रकारांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. बसस्थानक परिसरात शिस्तबद्ध रिक्षा स्टँडची व्यवस्था करावी, भाडे मीटर सक्तीने वापरण्याचे आदेश द्यावेत आणि वाहतूक पोलिसांनी नियमित पाहणी करून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास भविष्यात प्रवाशांना अधिक त्रास सहन करावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.