नसरापूर घटनेच्या निषेधार्थ कोल्हापुरात इंडिया आघाडीच्यावतीने राज्य सरकार विरोधात निदर्शने
कोल्हापूर - पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील माणुसकीला काळीमा फासणारी घटना दोन दिवसांपूर्वी उघडकीला आली आहे. एका साडेतीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना समोर आल्यानंतर महाराष्ट्रात राज्य सरकारच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. नसरापूर घटनेच्या निषेधार्थ कोल्हापुरात इंडिया आघाडीच्यावतीने सोमवारी सकाळी बिंद चौकात राज्य सरकार विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.
यावेळी आंदोलकानी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता. आंदोलना दरम्यान आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळात दहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये चांगलीच झटापट उडाली होती. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जुना राजवाडा पोलिसांनी बिंदू चौक परिसरात बंदोबस्त तैनात केला होता. यावेळी राज्य सरकार कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप ठाकरे सेनेचे उपनेते संजय पवार यांनी केला आहे.
या आंदोलनात काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण, भरत रसाळे, ठाकरे सेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष आर के पोवार, उदय पोवार, प्रवीण पाटील, कॉम्रेड दिलीप पवार, व्यंकाप्पा भोसले, राजेश वरक, चंद्रकांत भोसले, संजय पटकारे, संदीप मोहिते, संपतराव पाटील, भारती पोवार, वेदवती मोहिते, उज्वला चौगले, शुभांगी साखरे, पूजा आरडे, स्वाती कांबळे, दिपाली घाटगे यांच्यासह इंडिया आघाडी घटक पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.