काळम्मावाडी धरणाच्या पाणी पातळीत घट ; पाणी जपून वापरण्याचे महापालिकेचे आवाहन
कोल्हापूर - जून महिना निम्मा संपला तरी पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे काळम्मावाडी धरणातील पाणीसाठ्यात घट झाली आहे. काळम्मावाडी धरणातून थेट पाइपलाईन योजनेद्वारे होणारा पाणी उपसा बंद करण्यात आला आहे. पाणीसाठ्यात घट झाल्याने नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेने काळम्मावाडी धरण क्षेत्रातील इंटेक वेल आणि जॅक वेल परिसरात साचलेला गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. दोन एक्स्कॅव्हेटर मशिनच्या सहाय्याने हे काम युद्धपातळीवर सुरू असून पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. काळम्मावाडी योजनेतून पाणीपुरवठा बंद झाल्याने शहरासाठी पर्यायी शिंगणापूर पाणीपुरवठा योजनेचा आधार घेण्यात आला आहे. मात्र पंचगंगा नदीची पाणीपातळीही कमी झाल्यामुळे शिंगणापूर येथून मर्यादित प्रमाणातच पाणी उपसा करता येत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी महानगरपालिकेने जलसंपदा विभागाशी समन्वय साधला असून राधानगरी धरणातून पंचगंगा नदीत पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शिंगणापूर बंधारा पूर्ण क्षमतेने भरून घेतल्यानंतर शहरात एक दिवसाआड होणारा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहे. पाऊस सुरू होईपर्यंत उपलब्ध पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.