प्रयाग चिखलीत मध्यरात्री चोरी...१५ लाखांचा ऐवज लंपास
कोल्हापूर - करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली गावात मध्यरात्रीच्या सुमारात १५ लाखांची चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे.
सरदार गल्लीत हरी वसंत झिरंगे आणि शेजारी लक्ष्मण लोहार यांची घरे शेजारी शेजारी आहेत. हरी झिरंगे हे कुटुंबियांसमवेत देवदर्शनासाठी परगावी गेले होते. लक्ष्मण लोहार हे घराला कुलूप लावून फुलेवाडीतील घरी राहण्यासाठी गेले होते. याच संधीचा फायदा घेत रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी भरवस्तीतील झिरंगे आणि लोहार यांच्या बंद घरांची कुलुपं तोडून घरात प्रवेश केला. झिरंगे यांच्या घरातून जवळपास ११ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि लोहार यांच्या घरातील दागिने आणि २० हजारांची रोकड असा एकूण सुमारे १५ लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.
याशिवाय चोरट्यांनी गावातील एक ब्युटी पार्लर आणि बांगड्या विक्रीचे दुकान फोडून किरकोळ साहित्याची चोरी केली आहे. आज सकाळी या चोरीची माहिती मिळताच करवीरचे पोलीस उपाधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर आणि पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी झिरंगे आणि लोहार यांच्या फिर्यादीवरून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून करवीर पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.