महागाईमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर संकट ; समाजाची जडणघडणच अर्थव्यवस्थेचे प्रतिबिंब : अर्थतज्ज्ञ प्रा. डॉ. नीरज हातेकर
कोल्हापूर - महागाई, बेरोजगारी आणि वाढत्या किंमतींमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर संकट येत आहे. या परिस्थितीत समाजाची जडणघडणच अर्थव्यवस्थेचे प्रतिबिंब असते, असे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ प्रा. डॉ. नीरज हातेकर यांनी केले आहे. भाई माधवरावजी बागल विद्यापीठाच्यावतीने प्राचार्य रा. कृ. कणबरकर जयंतीनिमित्त "भारताची सध्याची आर्थिक स्थिती आणि सामान्य माणूस" या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
यावेळी शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे हे व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी बोलताना अर्थतज्ज्ञ प्रा. डॉ. नीरज हातेकर यांनी सध्याच्या आर्थिक परिस्थितीचे विविध पैलू उलगडून सांगितले. वाढत्या किंमतींमुळे सामान्य नागरिकांच्या जीवनावर होत असलेल्या परिणामांचा त्यांनी आढावा घेतला. उत्पादन, आयात-निर्यात, शिक्षण आणि आर्थिक धोरणांचा समाजावर होणारा प्रभाव याबाबतही त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
सध्याच्या आर्थिक परिस्थितीचा सामान्य माणसाच्या जीवनावर होणारा परिणाम आणि त्यामागील आर्थिक धोरणांचा वेध घेणारे हे व्याख्यान उपस्थितांसाठी मार्गदर्शक ठरले. व्याख्यानाचे अध्यक्ष डॉ. माणिकराव साळुंखे यांनी प्राचार्य कणबरकर यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या पश्चातही भाई माधवरावजी बागल विद्यापीठाच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम सुरू असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच जीडीपी, शेअर बाजार आणि बेरोजगारीच्या प्रश्नांवर भाष्य करत त्यांनी शासनाच्या आर्थिक धोरणांवर टीकाही केली.
यावेळी भाई माधवरावजी बागल विद्यापीठाचे कार्याध्यक्ष डॉ. टी. एस. पाटील, संचालक रवी जाधव, अनिल घाटगे, संभाजीराव जगदाळे, चंद्रकांत यादव, जितेंद्र कांबळे, शंकरराव काटाळे, व्यवस्थापक परशुराम माने यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.