नीट पेपरमधील गैरप्रकार टाळण्यासाठी केंद्राने घेतला मोठा निर्णय...

<p>नीट पेपरमधील गैरप्रकार टाळण्यासाठी केंद्राने घेतला मोठा निर्णय...</p>

नवी दिल्ली – नीट पेपर फुटीच्या प्रकारामुळे केंद्र सरकार चांगलेच सतर्क झाले आहे. त्या अनुषंगाने फेरपरीक्षेपूर्वी केंद्र सरकारने परीक्षा अत्यंत सुरक्षित आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच  गैरप्रकार टाळण्यासाठी टेलीग्राम या मेसेजिंग ॲपवर तात्पुरती बंदी घातली आहे. 

नीट 2026 ची परीक्षा 21 जून रोजी होणार आहे. त्यानुसार  टेलिग्रामवरील ही बंदी 22 जूनपर्यंत राहणार आहे. तसेच टेलिग्रामचे मेसेज एडिट करण्याचे फीचर 30 जूनपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. 
काही गुन्हेगारी टोळ्या टेलिग्राम चॅनेल्सचा वापर करून विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना कथित प्रश्नपत्रिका देण्याच्या नावाखाली फसवणूक करत होत्या. नीटचा पेपर लीक, पुन्हा नीट 2026 अशा नावांचे चॅनेल्स तयार करून हजारो ते लाखो रुपयांची मागणी केली जात होती. यावर स्पष्टीकरण देत एनटीएने म्हटले आहे की, परीक्षेची प्रश्नपत्रिका पूर्णपणे सुरक्षित असून ती परीक्षेपूर्वी कोणाकडेही उपलब्ध नाही.
अनेक प्रकरणांमध्ये टेलिग्रामच्या मेसेज एडिट फीचरचा गैरवापर करण्यात आला होता. परीक्षा संपल्यानंतर जुन्या मेसेजमध्ये फेरबदल करून त्यात खरी प्रश्नपत्रिका जोडली जायची. यामुळे ती प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्यापूर्वीच लीक झाली होती, असा खोटा भास निर्माण केला जात असे. अशा प्रकारच्या बनावट पेपर लीकच्या अफवा आणि साहित्य पसरवण्याला आळा घालण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे.