शहरातील अतिक्रमणांवर कठोर कारवाई करा : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

<p>शहरातील अतिक्रमणांवर कठोर कारवाई करा : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड</p>

कोल्हापूर -  महापालिकेच्या आयुक्त कार्यालयात सोमवारी आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागप्रमुखांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शहरातील पाणीपुरवठा, कर वसुली, शिक्षण, उद्याने तसेच विविध विकास कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

या बैठकीत शहरातील फुटपाथ, रस्ते तसेच श्री अंबाबाई मंदिर आणि रंकाळा परिसरातील अतिक्रमणांवर सातत्याने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. प्रत्येक विभागीय कार्यालयाला स्वतंत्र अतिक्रमण निर्मूलन वाहन उपलब्ध करून देण्यात येणार असून, ज्या ठिकाणी यापूर्वी कारवाई झाली आहे. तिथं पुन्हा अतिक्रमण आढळल्यास तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. फेरीवाला परवाना नसलेल्या तसेच मंजूर जागेव्यतिरिक्त अन्यत्र व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहे. परवानाधारक व्यक्तीऐवजी इतर कोणी व्यवसाय करत असल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेले साहित्य महासभेच्या धोरणानुसार परत दिले जाणार नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

बैठकीत बदली आदेशानंतरही रुजू न झालेल्या कर्मचाऱ्यांची यादी सादर करण्याचे आदेश देत अशा कर्मचाऱ्यांवर 'विना वेतन' कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. सर्व पाणीमीटर रीडर यांच्या बदल्यांचे नियोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. महापालिकेच्या स्वनिधीतून आयुक्तांच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणतेही बिल अदा करू नये, अशा सक्त सूचना वित्त विभागाला देण्यात आल्या आहेत. चारही विभागीय कार्यालयांना स्वतंत्र बूम लिफ्टर उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्याचा वापर सहाय्यक आयुक्तांच्या नियंत्रणाखालीच होणार आहे. अनधिकृत वापर अथवा परस्पर हलवण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधितांविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले आहे.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, उप-आयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त जयंत जावडेकर, स्वाती दुधाणे, डॉ. विजय पाटील, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, लेखा आणि वित्त अधिकारी राजश्री पाटील, आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा, प्रशासनाधिकारी जयश्री जाधव, उपशहर अभियंता सुरेश पाटील यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.