थकीत पेन्शन तात्काळ जमा करा, अन्यथा...: लाल बावटा संघटनेचा इशारा
इचलकरंजी – शहर आणि परिसरात जवळपास ४० हजार पेन्शनधारक आहेत. गेल्या दीड वर्षापासून शासनाच्या डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफर प्रक्रियेमुळे अनेक लाभार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. केवायसी, आधार अपडेट आणि अन्य तांत्रिक कारणांमुळे अनेकांची पेन्शन बंद झाली आहे. तसेच संबंधित त्रुटी दूर करूनही अनेक लाभार्थ्यांची सहा महिने, आठ महिने आणि काहींची वर्ष दीड वर्षांची पेन्शन अद्याप थकीत आहे. आज इचलकरंजी शहर आणि परिसरातील हजारो वृद्ध, निराधार, विधवा आणि परित्यक्ता पेन्शनधारकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर लाल बावटा संलग्न संघटनेच्यावतीने मेळावा घेण्यात आला. अनेक महिने थकीत असलेली पेन्शन तात्काळ खात्यात जमा करावी, वृद्ध, निराधार, विधवा आणि परित्यक्ता महिलांनाही दिव्यांग लाभार्थ्यांप्रमाणे अडीच हजार रुपये पेन्शन द्यावी, अशा मागण्या या मेळाव्यात करण्यात आल्या. संजय गांधी निराधार योजना कार्यालयात थकीत पेन्शनच्या चौकशीसाठी गेल्यानंतर वारंवार 'साइट डाऊन' असल्याचे कारण देत लाभार्थ्यांना हेलपाटे मारावे लागत असल्याबद्दलही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. येत्या पंधरा दिवसांत या प्रश्नांवर ठोस तोडगा निघाला नाही तर १ जुलैपासून अप्पर तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन छेडू, असा इशारा संघटनेच्यावतीने देण्यात आला.
या मेळाव्याला कॉम्रेड भरमा कांबळे, कॉम्रेड भाऊसाहेब कसबे, संजय टेके, सदा मलाबादे, धनाजी जाधव, उषा माळी यांच्यासह पेन्शनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.