राज्यातील धरणांत 25 टक्के पाणी साठा : शेतीसाठी धरणातील पाणी सोडणे बंद करा : शासनाचे निर्देश

<p>राज्यातील धरणांत 25 टक्के पाणी साठा : शेतीसाठी धरणातील पाणी सोडणे बंद करा : शासनाचे निर्देश</p>

मुंबई – यंदा पाऊस कमी असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. अशात मान्सून लांबणार असल्याने पाण्याची टंचाई राज्यात जाणवू शकते. त्यामुळे राज्यातील धरणांमध्ये असलेला पाणीसाठा पुढील तीन महिने फक्त पिण्यासाठीच वापरला जावा. तसेच सिंचनासाठी म्हणजेच शेतीसाठी धरणातील पाणी सोडणे बंद करा, असे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. तसेच  बेकायदेशीर पाणी उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. 

सरकारने पुढील तीन महिने म्हणजे 31ऑगस्ट 2026 पर्यंत नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहेत. राज्यातील धरणांमध्ये आजघडीला फक्त 25 टक्केच पाणी साठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत तो कमी आहे. पाऊस तुलनेने कमी झाल्याने धरणांमध्ये जलसाठा झाला नाही. 

राज्यातील मोठे, मध्यम व लघु, अशा तीन हजार 28 प्रकल्पांमध्ये सध्या 24.74 टक्के जलसाठा शिल्लक आहे. गतवर्षीच्या तुलनेत जलसाठ्चात यंदा पाच टक्के घट झाली आहे. त्यामुळे 20 जिल्ह्यांतील साडेतीन हजार गावे, वाड्यांना अजूनही 1003 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. मोठे 138 प्रकल्प असून, त्यात केवळ 23.80 टक्के पाणी आहे. गतवर्षी पाण्याची स्थिती 28.78 इतकी होती. 264 मध्यम प्रकल्पात 30.52 टक्के जलसाठा असून, गतवर्षी मध्य प्रकल्पांमध्ये या कालावधीत 39.61 टक्के पाणी होते. लघु प्रकल्पांची संख्या दोन हजार ६२६ असून, पाणीसाठ्याची टक्केवारी 23.86 आहे. गतवर्षी या प्रकल्पांमध्ये 30.59 टक्के पाणी होते. सध्या जून महिन्याचा मध्य आला तरी पावसाने हजेरी लावली नाही त्यामुळे राज्यातील अनेक प्रकल्पांनी तळ गाठला आहे.