‘या’ मंदिर प्रशासनाने जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा कमी करण्यासाठी लढवली ‘व्हीआयपी’ शक्कल...सर्वस्तरातून कौतुकाचा वर्षाव
इंदूर - मध्य प्रदेश राज्यामधील खांडवा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत होता. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक रुग्णांना रक्तासाठी झगडावं लागत होतं. हा तुटवडा कमी करण्यासाठी खांडवा येथील ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर प्रशासनाने उल्लेखनीय उपक्रम राबवत पुढाकार घेतला आहे.
ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर प्रशासनाने भाविकांना फेब्रुवारीपासून रक्तदान केल्याच्या बदल्यात मोफत 'व्हीआयपी' प्रवेशाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या उपक्रमामुळे खांडवा जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीतील रक्ताचा तुटवडा तर संपलाच आहे, शिवाय शेजारील जिल्ह्यांनाही मोठ्या प्रमाणावर रक्ताचा पुरवठा केला जात असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खांडवा येथून मध्यप्रदेशातील बैतुल, धार आणि बुरहानपूर जिल्ह्यांना प्रत्येकी १५० युनिट, बडवानी जिल्ह्याला २०० युनिट, तर हरदा जिल्ह्याला ८० युनिट रक्त वर्ग (ट्रान्सफर) करण्यात आले आहे. भाविकांच्या या उदंड प्रतिसादामुळे 'एबी-नेगेटिव्ह', 'ओ-नेगेटिव्ह', 'ए-नेगेटिव्ह' आणि 'बी-नेगेटिव्ह' यांसारख्या अत्यंत दुर्मिळ रक्तगटांचा पुरेसा साठा गोळा करण्यात प्रशासनाला यश आले आहे.