महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या राज्यव्यापी दौऱ्याचा सोलापुरात शुभारंभ...
कोल्हापूर - "कुस्तीचा विकास, खेळाडूंचा सन्मान आणि महाराष्ट्राचा अभिमान" हे ब्रीद घेऊन महाराष्ट्र कुस्ती संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या राज्यव्यापी दौऱ्याचा शुभारंभ सोलापूर जिल्ह्यातून करण्यात आला आहे. यावेळी सर्व उपस्थितांनी एकमुखाने संघटनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची शपथ घेतली आहे.
कुस्ती क्षेत्र आणि पैलवानांना भेडसावणाऱ्या विविध समस्या शासनापर्यंत ताकदीने पोहोचवून त्या मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र कुस्ती संघटना कटिबद्ध आहे. यानंतर माळशिरस मधील शिंदेवाडी जंगी कुस्त्यांच्या मैदानात महाराष्ट्र कुस्ती संघटनेची भूमिका, उद्दिष्टे, बांधणी आणि कार्यपद्धती याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी पैलवान संग्राम कांबळे यांनी नव्या संघटनेचा उद्देश स्पष्ट केला. लवकरच कुस्तीची पंढरी असणाऱ्या कोल्हापूरमध्ये कार्यक्रम आयोजित करुन संघटनेच्या नावाचे आणि लोगोचे अनावरण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर, महाराष्ट्र चॅम्पियन अमोल आबा मदने, कल्याण केसरी आयोजक जितेंद्र भगत, कुस्ती निवेदक अशोक धोत्रे, पैलवान बाळासाहेब कांबळे, महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखचे वडील रशीद शेख, पैलवान रामदास देसाई, पैलवान सचिन वाघ आदी उपस्थित होते.