बलात्कार व छेडछाड प्रकरणी SITची एन्ट्री; तपासाला वेग
कोल्हापूर : हातकणंगले व शाहुपुरी परिसरात नोंद झालेल्या महिलांविरुद्धच्या गंभीर व संवेदनशील गुन्ह्यांच्या तपासासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. २६ एप्रिल २०२६ रोजी हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात शाहीद समीर सनदे (वय २२) व शाहरुख हुसेन देसाई (वय ३०, दोघेही रा. शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) यांना अटक करण्यात आली आहे. २९ एप्रिल रोजी न्यायालयात हजर केल्यानंतर दोन्ही आरोपींना ४ मे २०२६ पर्यंत सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, २९ एप्रिल रोजीच शाहुपुरी पोलीस ठाण्यात पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी शाहीद सनदे याच्याविरुद्ध बलात्कार, छेडछाड व धमकीचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील करीत आहेत.
दोन्ही गुन्हे महिलांविरुद्धचे असून अत्यंत गंभीर व संवेदनशील स्वरूपाचे असल्याने त्यांचा सखोल व व्यापक तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी तातडीने SIT स्थापन करण्याचे आदेश दिले. या पथकाचे नेतृत्व अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरज कुमार करीत असून, त्यांच्यासह प्रिया पाटील, अमोल ठाकुर यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश आहे. या प्रकरणात आरोपींविरुद्ध ठोस पुरावे गोळा करून कठोर कारवाई करण्यासाठी SITमार्फत तपास वेगाने सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.