प्राचार्या शुभांगी गावडे यांचे निधन 

<p>प्राचार्या शुभांगी गावडे यांचे निधन </p>

कोल्हापूर - स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी मुरलीधर गावडे यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले आहे. यावेळी त्यांचे वय ५३ वर्ष होते. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या त्या नात होत्या. तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या कन्या आणि संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांच्या त्या मातोश्री होत्या. 

शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी 1954 साली स्थापन केलेल्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये सन 2008 पासून सलग 18 वर्षे सचिव म्हणून त्यांनी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचा शैक्षणिक, सामाजिक कार्याचा वारसा समर्थपणे सांभाळला आहे. संस्थेच्या सुमारे 410 संस्कार केंद्रातून त्यांच्या सचिव पदाच्या प्रशासकीय कालावधीत त्यांच्या कार्य कर्तृत्वातून शैक्षणिक क्षेत्रात आधुनिक बदल करण्यासाठी त्यांनी नवनवीन योजना संस्थेच्या विविध शाखांमध्ये राबविल्या आहेत. इंजिनिअरींग, नर्सिंग, हॉटेल मॅनेजमेंट, आर्टिफिशीयल इंटिलिजन्स्, लॉ कॉलेज या शाखांचा शुभारंभ त्यांच्या कार्यकाळात झाला. त्यांनी संस्थेच्या विविध शाखांना गुणवत्तापूर्ण करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा पुरवून स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचा नावलौकिक वाढविला आहे. संस्थेच्या विद्यार्थ्यांच्यासाठी साहित्य, नृत्य, नाटय, कला, संगीत आणि इंग्रजी, फ्रेंच, संस्कृत, जर्मन भाषांच्या विकासासाठी महत्पूर्ण योगदान दिले आहे. 
त्यांनी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये सहशिक्षिका, प्राचार्या व सेक्रेटरी पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. त्यांनी न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या, शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट सदस्या, राज्य शासनाच्या तेजस्विनी महिला आश्रमामध्ये शिक्षणतज्ज्ञ व महिला कल्याण समितीवर सदस्य म्हणून काम केले आहे. त्यांना आदर्श महिला पुरस्कार, राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार, आधुनिक सावित्री पुरस्कार आदि पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.