जनगणना २०२७ च्या पार्श्वभूमीवर कागल तालुक्यातील प्रशासन सज्ज...
कोल्हापूर – जनगणना २०२७ च्या पार्श्वभूमीवर कागल तालुक्यात प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. तहसीलदार कार्यालयाच्यावतीने प्रगणक आणि पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण सध्या सुरू असून श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूल कागल येथे हे प्रशिक्षण सुरु आहे. २७ ते २९ एप्रिल दरम्यान सुमारे १५० कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. पुढील टप्प्यात आणखी ३०० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. जनगणना प्रक्रिया पहिल्यांदाच डिजिटल पद्धतीने होणार आहे. नागरिकांना १ मे ते १५ मे या कालावधीत “स्वयंगणना” करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मोबाईल किंवा संगणकाच्या माध्यमातून घरबसल्या माहिती भरता येणार आहे. १६ मे ते १४ जून दरम्यान घरयादी तयार करणे आणि प्रत्यक्ष जनगणना प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. स्वयंगणना केल्यानंतर मिळणारा युनिक आयडी जतन करणे आवश्यक असून, प्रगणक भेटी दरम्यान तो दाखवावा लागणार आहे. नागरिकांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन माहिती भरून राष्ट्रीय कर्तव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.