कुरुंदवाड शहरात हातगाड्यांच्या अतिक्रमणात वाढ... 

वाहतूक कोंडी, पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

<p>कुरुंदवाड शहरात हातगाड्यांच्या अतिक्रमणात वाढ... </p>

कोल्हापूर - शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड नगरपालिका कार्यालय परिसरात अधिकृत पार्किंगची सोय नसल्याने वाहनधारक रस्त्यावरच वाहने उभी करत आहेत. विशेषतः बँकेसमोरील रस्त्यावर हातगाड्यांच्या अतिक्रमणामुळे नागरिकांना ये-जा करणे कठीण झाले आहे. तसेच शहरातील सरकारी दवाखाना, रस्ता, पालिका चौक आणि नवबाग परिसरातही अतिक्रमण वाढले आहे. तसेच काही ठिकाणी वाहन काढण्यावरुन वाद आणि दमदाटीचे प्रकारही वाढल्याच्या तक्रारी आहेत. बेकायदेशीर पार्किंग आणि हातगाड्यांमुळे रस्त्यांची रुंदी कमी झाली असून वाहतूक कोंडीमुळे अपघाताचा धोका वाढला आहे.

 पालिका चौकात वारंवार किरकोळ अपघात घडत असून पार्किंगच्या कारणावरून वाद झाल्याचेही पहायला मिळाले आहे. रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. सार्वजनिक रस्त्यांवरील अतिक्रमण हटवणे गरजेचे असतानाही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. तसेच राजकीय दबावामुळे अतिक्रमण मोहीम रखडल्याची चर्चा आहे. तरी प्रशासनाकडून तातडीने अतिक्रमण हटवून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी वाहनधारकांमधून होत आहे.