महिलेस शिवीगाळ; करवीर पोलिसात गुन्हा दाखल
कोल्हापूर: आर के नगर परिसरातील स्वामी सेवा केंद्राच्या परिसरात स्वामी समर्थ पुण्यतिथी कार्यक्रमाच्या निमित्ताने मंडप उभारणी करत असताना एक गंभीर वाद घडला आहे. सेवेकरी महिला स्नेहा बराले यांना आशिष पोवार याने शिवीगाळ केली आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद स्नेहा बराले यांनी करवीर पोलिसांत दिली आहे.
स्नेहा बराले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 30 एप्रिल रोजी स्वामी पुण्यतिथी सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित स्वामी सेवेसाठी स्नेहा बराले मंदिराच्या परिसरात जात असताना आशिष पोवार याने त्यांना शिवीगाळ केली. तसेच, “मंडप कोणाला विचारून घालत आहात?” असा सवाल करत त्यांना धमकावले. "मंदिरात भोंदूगिरी चालते आहे का? अफरातफर करताय का? परत स्वामी सेवा केंद्रात यायचे नाही किंवा अन्य कोणी सेवेकरी मंदिरात आले तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही." असे म्हणत आशिष पोवार याने धमकावले.
या घटनेनंतर स्नेहा बराले यांनी करवीर पोलिसात तक्रार दाखल केली, आणि त्यावरून आशिष पोवार याच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करवीर पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
दरम्यान, भाविकांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आर के नगर परिसरातील महिलांनी डी वाय एस पी क्षीरसागर यांची भेट घेऊन आशिष दिनकर पोवार याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली.