राष्ट्रसेवा दलाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष भरत लाटकर यांचे निधन
कोल्हापूर - समाजवादी कार्यकर्ते, राष्ट्रसेवा दलाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि साने गुरुजींच्या विचारांचे निष्ठावंत अनुयायी भरत कल्लाप्पा लाटकर यांचे आज निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील पुरोगामी आणि समाजवादी चळवळीचा एक महत्त्वाचा पर्व संपल्याची भावना व्यक्त होत आहे.
भरत लाटकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाज कार्यासाठी समर्पित केले होते. साने गुरुजींच्या 'श्यामची आई' या पुस्तकातून आणि त्यांच्या मानवतावादी विचारांतून प्रेरणा घेऊन त्यांनी आयुष्यभर लोकशाही मूल्यांची जोपासना केली. राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून त्यांनी देशभरातील तरुण पिढीला संस्कारित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले.
लाटकर यांनी आयुष्यभर युवकांमध्ये लोकशाही, धर्मनिरपेक्षता, सामाजिक समता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी अथक परिश्रम घेतले. कोल्हापूर महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजू लाटकर यांचे ते वडील होते.