जातीच्या चौकटीत न अडकता आम्ही भारतीय म्हणून जगायला सुरुवात करा : कवी नितीन चंदनशिवे
कोल्हापूर – देशातला सध्याचा धोका ओळखा आणि जातीच्या चौकटीत न येता, आम्ही भारतीय म्हणून जगायला सुरुवात करा, असे प्रतिपादन कवी नितीन चंदनशिवे यांनी केले आहे. राजर्षी छत्रपती शाहू यांच्या जयंतीचे औचित्य साधून समाजक्रांती सांस्कृतिक चळवळीच्यावतीने राजर्षी महोत्सव आणि लोकराजा शाहू कोल्हापूर भूषण महागौरव पुरस्कार २०२६ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
या सोहळ्याचे उद्घाटन ज्येष्ठ पुरोगामी सामाजिक कार्यकर्त्या सरोज पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष उत्तम कांबळे होते यावेळी बोलताना चंदनशिवे यांनी, वाईट विचारांना गाडून टाकाल तरच माणसाला माणूसपण देणारे भारतीय संविधान टिकेल, असे सांगत त्यांनी राजकीय परिस्थितीवर भाष्य करत मार्मिक भाष्य केले.
यावेळी सरोज पाटील, माजी आमदार राजीव आवळे, उत्तम कांबळे, डॉ. मेघा पानसरे यांनी मनोगतं व्यक्त केले. या कार्यक्रमात सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे डॉ. आनंद हाबळे, तुकाराम खराडे, प्राचार्य. डॉ. महादेव नरके, डॉ. रणजीत मिणचेकर, अब्राहम आवळे, बाळासाहेब वाशीकर, सुखदेव बुध्याळकर आदींना लोकराजा शाहू कोल्हापूर भूषण महागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी आजी - माजी विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष डॉ. प्रविण कोडोलीकर, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब देवकर, समाजक्रांती सांस्कृतिक चळवळीचे संस्थापक अध्यक्ष वैभव प्रधान, बाजार समितीचे माजी उपाध्यक्ष अमित कांबळे, कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गुणवंत नागटिळे यांच्यासह पुरस्कार विजेते आणि त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.