कळंबा परिसरातील जुगार अड्डयावर छापा...आठ जण ताब्यात
कोल्हापूर - कळंबा येथील हॉटेल निलेश डायनिंगच्या मागील बाजूस असलेल्या बंदिस्त खोलीत तीन पानी जुगार सुरू असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकाने रविवारी छापा टाकला. कारवाई दरम्यान अमोल धोंडीराम साळोखे, विनायक विलास शिंदे, मारुती आनंदा बराले, सुनिल मारुती मांगले कुमार, केरबा पांडुरंग जाधव, प्रकाश मारुती चव्हाण, महादेव आनंदा तिवले, पांडुरंग शांताराम खानविलकर हे आठ जण जुगार खेळताना आढळून आले.
पोलिसांनी त्यांच्याकडून ३२ हजार ६०० रुपयांची रोख रक्कम, नऊ मोबाईल हँडसेट आणि जुगाराचे साहित्य असा एकूण १ लाख ६९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी संबंधित आठही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.