एका महिन्याच्या चिमुकलीला सोडून आईने केली आत्महत्या...राजारामपुरीतील घटना
कोल्हापूर – कोल्हापूर शहरातील राजारामपुरी येथे एका महिन्याच्या चिमुकलीला सोडून आईने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अस्मिता प्रतीकसिंह काटकर असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. घरात मुलीच्या बारशाची लगबग सुरू असताना अस्मिताने गळफास घेवून आपले जीवन संपवले आहे. ही सर्व घटना काल दुपारच्या दरम्यान घडली आहे. अस्मिताच्या मृत्यूनंतर तिच्या आई-वडिलांनी सासरकडील लोकांवर गंभीर आरोप केले आहेत.
आमच्या मुलीने आत्महत्या केली नसून तिची हत्या केली आहे. लग्न झाल्यापासून पैशासाठी अस्मिताचा छळ केला. रोख रक्कम आणि ऑनलाईन पद्धतीने देखील पैसे पाठवले आहेत. आता देखील मुलीच्या बारशासाठी 52,000 हजार रुपयांचा पाळणा ऑनलाईन ऑर्डर केला होता आणि सर्व कार्यक्रम करण्यासाठी तगादा लावला होता. त्यामुळे काटकर कुटुंबियांनी माझ्या मुलीची हत्या केली आहे, असा आरोप अस्मिता यांच्या आई - वडिलांनी केला आहे. तसेच अस्मिताच्या सासरकडील लोकांनी मुलांचे कपडे घेऊन ठेवले होते. परंतु मुलगी झाल्याने त्यांनी सतत अस्मिताचा छळ केला, असा आरोपही आई-वडिलांनी केला आहे.