इचलकरंजीत नशेच्या इंजेक्शनचा साठा जप्त...
इचलकरंजी – शहरा नजीकच्या कबनूरमधील निखील पाटील हा तरुण प्रतिबंधित नशेची इंजेक्शन ऑनलाईन मागवून जास्त दराने विक्री करत असल्याची गोपनीय माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून १३ जुलै रोजी रात्रीच्या सुमाराला निखील पाटीलच्या घरावर छापा टाकला. यावेळी पोलिसांना निखील पाटील याच्याकडे नशेच्या इंजेक्शनचा साठा आढळून आला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात निखील शंकर पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी १५ हजार रुपये किंमतीच्या सल्फेट इंजेक्शनच्या १० मिलीच्या ५१ बाटल्या, आणि एक मोबाईल फोन, असा एकूण ३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मेफटेरेमाईन सल्फेट हे औषध वैद्यकीय वापरासाठी असले तरी त्याची बेकायदेशीर विक्री आणि गैरवापर होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी ही कारवाई केली. इचलकरंजी आणि परिसरात प्रतिबंधित औषधांची बेकायदेशीर विक्री रोखण्यासाठी पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली असून, अशा कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. शिवाजीनगर पोलिसांनी अंमली पदार्थ आणि प्रतिबंधित औषधांच्या अवैध साठ्यावर कारवाई केल्याने काळा बाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणातील संशयिताचा पुरवठादार कोण, हा साठा आणि तो पुढे कुणाला विकला जाणार होता, याचा तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.