कोल्हापुरातील संगणक प्रशिक्षण संस्थेने बोगस प्रमाणपत्र दिल्याचा आरोप...
कोल्हापूर – शहरातील सदर बाजार परिसरात राहणाऱ्या सायली सतीश माने यांनी ऑगस्ट २०२५ मध्ये संभाजीनगर परिसरातील एका संगणक प्रशिक्षण संस्थेत संगणक आणि टायपिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. मात्र, परीक्षा प्रक्रिये दरम्यान हॉल तिकीट न देता, "सर्व प्रक्रिया आम्ही पूर्ण करू आणि थेट प्रमाणपत्र मिळेल," असे सांगण्यात आल्याचा आरोप सायली माने यांनी केला आहे.
वारंवार विचारणा करूनही संबंधित संस्थेने प्रमाणपत्र द्यायला टाळाटाळ केल्यामुळे एमपीएससी गट क परिक्षेसाठी अर्ज दाखल करता आला नसल्याने आपले नुकसान झाल्याचे माने यांनी सांगितले आहे. संबंधित संस्थेने व्हॉटस्अॅप द्वारे पाठवलेले प्रमाणपत्र बनावट असल्याचा दावा सायली माने यांनी केला आहे. संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानने शहर डीवायएसपी प्रिया पाटील यांना निवेदन सादर करत संबंधित संगणक प्रशिक्षण संस्थेची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
यावेळी शिवराम बुद्धयाळकर, पंकज आठवले, विकी कांबळे, अक्षय किर्तीकर, अमित समुद्रे, सचिन माने यांच्यासह संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.