मैत्रिणीच्या मदतीने शेजारीच केली चोरी...चोरट्याला अटक
कोल्हापूर – भुदरगड तालुक्यातील फये गावातील चोराने मैत्रिणीच्या मदतीने शेजारीच चोरी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे गावात उलट- सुलट चर्चांना उधाण आले आहे.
करवीर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला भुदरगड तालुक्यातील फये गावातील रेकॉर्डवरील गुन्हेगार अवधूत लहू धुरे हा कोल्हापूरातील नवीन वाशी नाका परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून अवधूत धुरेला ताब्यात घेतले आहे. चौकशी दरम्यान त्याच्याकडून चोरीतील चार लाख सहा हजार नऊशे एकोणसाठ रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यावेळी त्याने एक लाख त्रेचाळीस हजार रुपये किंमतीचा सोन्याचा नेकलेस गारगोटीतील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत तारण ठेवल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी तो नेकलेस जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अवधूतने गारगोटीमधील त्याची मैत्रीण तेजस्विनी विक्रम बुरबुसे हिच्या मदतीने नागदेववाडीतील महेश्वर कॉलनीमधील शितल रामचंद्र गावडे या शेजाऱ्यांच्या घरातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली.
या चोरीत मदत करणारी त्याची मैत्रीण बुरबुसे हिलाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अवधूत धुरे विरुद्ध यापूर्वी दुचाकी चोरीचे चार गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. न्यायालयाने संशयित अवधूतला पोलीस कोठडी सुनावली आहे. हेड कॉन्स्टेबल रणजीत पाटील या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.