इचलकरंजीतील झोपडपट्ट्यांचे चित्र बदलणार...
इचलकरंजी - शहरात विविध ठिकाणी असलेल्या झोपडपट्ट्यांच्या ठिकाणी घरकुलांची निर्मिती केली जाणार आहे. याबाबतचा सामंजस्य करार इचलकरंजी महापालिका आणि पुण्यातील शेल्टर असोसिएट्स यांच्यात झाला आहे. यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार राहूल आवाडे, आयुक्त पल्लवी पाटील, उपमहापौर अनिल डाळ्या यांच्यासह पुण्यातील शेल्टर असोसिएट्सच्या प्रतिमा जोशी उपस्थित होत्या.
आयुक्त पल्लवी पाटील यांनी, शहरातील सर्व झोपडपट्ट्यांचे शेल्टर असोसिएट्सतर्फे सर्व्हेक्षण केले जाईल. यातून उपलब्ध होणारा डाटा हा महापालिकेच्या भविष्यकालीन योजनांसाठी उपयुक्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. घरकूल प्रकल्पासाठी शेल्टर असोसिएट ही संस्था तांत्रिक सहकार्य करणार आहे. कंपनीच्या प्रतिमा जोशी यांनी झोपडपट्टी सर्व्हेक्षणातील काही महत्वाच्या बाबींचे यावेळी विश्लेषण केले. सुरुवातीला दोन ठिकाणी प्रायोगिक तत्वावर घरकुलांची निर्मिती केली जाणार आहे. यामध्ये ३०० चौरस फुटाचे चटई क्षेत्र असणार आहे. तसेच पंतप्रधान आवास योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
खासदार धैर्यशील माने यांनी, या गृह प्रकल्पात येणा-या अडचणी दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. घरकुलांच्या निर्मितीमुळे इचलकरंजी शहरात विविध ठिकाणी असलेल्या झोपडपट्टी परिसराचे चित्र लवकरच बदलणार असल्याचे आमदार राहुल आवाडे यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला उपायुक्त अशोक कुंभार, शिक्षण सभापती विद्या साळुंखे, नगरसेवक रवी रजपूते, ओंकार सुर्वे, रणजीत जाधव, उदयसिंह पाटील, राजू बोंद्रे, माजी नगरसेवक अब्राहम आवळे, नितीन कोकणे, नगरसेविका अलका स्वामी, प्रधानमंत्री आवास योजनेच्या तांत्रिक कक्षाच्या प्रमुख शुभांगी जोशी यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या.