अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांचे निधन

<p>अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांचे निधन</p>

दौंड : राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ) दौंड गटाचे समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील (वय ४५) यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.
तुषार पाटील यांनी कोल्हापूर येथे शहर पोलीस उपअधीक्षक म्हणून उल्लेखनीय सेवा बजावली होती. तसेच त्यांनी पोलीस कंट्रोल रूम (पीसीआर) अधीक्षक म्हणूनही कार्य केले होते. सुमारे सहा महिन्यांपूर्वी त्यांची दौंड येथे समादेशक पदावर बदली झाली होती.

सुमारे आठ वर्षांपूर्वी त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. त्यावेळी त्यांच्या वडिलांनी त्यांना किडनी दान केली होती. शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती चांगली होती आणि ते नियमितपणे सेवेत कार्यरत होते. दोन दिवसांपूर्वी रक्ताची उलटी झाल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ते कोमात होते. आज उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

कोल्हापूरमध्ये त्यांचे वास्तव्य जिल्हा परिषदेजवळील एका अपार्टमेंटमध्ये होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी शिल्पा नाईक, मुलगा संकेत आणि एक भाऊ असा परिवार आहे. त्यांच्यावर उद्या (सोमवारी) सकाळी ९ वाजता जामनेर (जि. जळगाव) येथील त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.