‘या’ जिल्ह्याने घरगणना मोहिमेत राज्यात पटकावला पहिला क्रमांक
सिंधुदुर्ग - सध्या देशात जनगणना मोहीम सुरु आहे. या मोहिमेतील पहिल्या टप्प्यातील घरगणना मोहिम १०० टक्के पूर्ण करण्याचा मान सिंधुदुर्ग जिल्ह्याने मिळवला आहे. अवघ्या २० दिवसांच्या विक्रमी कालावधीत घरगणनेचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करणारा सिंधुदुर्ग हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे.
जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यातील घरगणना मोहीम १६ मे २०२६ पासून सुरू करण्यात आली होती. या मोहिमेत जिल्ह्यातील ०८ तहसील कार्यालये, ०३ नगरपरिषदा आणि ०५ नगरपंचायती अशा एकूण १६ कार्यालयांचा सहभाग होता. जिल्ह्यातील २६० पर्यवेक्षक आणि १ हजार ४६० प्रगणकांनी अथक परिश्रम घेत १ हजार ४५१ घरयादी गटांची गणना यशस्वीरित्या पूर्ण केली.