इचलकरंजी उपविभागातील रेकॉर्डवरील १९० सराईत आरोपींना एकत्रितपणे बोलावून केले समुपदेशन
पुन्हा गुन्हा केल्यास तुरुंवास अटळ ; १९० आरोपींना पोलिसांचा दम
इचलकरंजी - इचलकरंजी उपविभागातील पाचही पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या काही वर्षांत खून, मारामारी, दरोडा, चोरी, दमदाटी, अपहरण तसेच मोक्का अंतर्गत कारवाई झालेले अनेक आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहेत. अशा आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. यानुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात १९० आरोपींना बोलावून त्यांचे समुपदेशन करण्यात आले.
यावेळी प्रत्येक आरोपीचा गुन्हेगारी इतिहास तपासण्यात आला. कुणावर किती गुन्हे दाखल आहेत, त्यांची सद्यस्थिती काय आहे याची माहिती घेण्यात आली. तसेच भविष्यात कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यात सहभागी न होण्याच्या सूचना देण्यात आल्या. अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी आरोपींना स्पष्ट शब्दांत इशारा देत सांगितले की, कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचा किंवा पुन्हा गुन्हेगारी मार्गाचा अवलंब करण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पोलिसांनी 'दत्तक आरोपी योजना' सुरू केली असून प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याकडे एका रेकॉर्डवरील आरोपीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत संबंधित आरोपींच्या हालचाली, समाजातील वर्तन, रोजगार, सामाजिक संबंध आणि त्याच्याकडून कोणतीही दमदाटी अथवा बेकायदेशीर कृत्ये होत नाहीत ना यावर लक्ष ठेवले जाणार आहे.
गुन्हेगारीकडून सामाजिक मुख्य प्रवाहाकडे वळण्यासाठीही त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. रेकॉर्डवरील आरोपींना अशा पद्धतीने एकत्रित बोलावून समुपदेशन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड पाचही पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक आणि मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.