पत्रकारितेत एआयचा जबाबदारीने वापर ही काळाची गरज : आ. डॉ. विनय कोरे

<p>पत्रकारितेत एआयचा जबाबदारीने वापर ही काळाची गरज : आ. डॉ. विनय कोरे</p>

कोल्हापूर -  पत्रकारिता हा लोकशाहीचा पावित्र्य जपणारा महत्त्वाचा स्तंभ असून कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने, विवेकाने आणि समाजहिताच्या दृष्टीने होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. विनय कोरे यांनी केले. वारणानगर येथील पत्रकारितेत आय ए चा जबाबदार आणि प्रभावी वापर याविषयी पत्रकारांसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

 वारणा विद्यापीठाचे अग्रणी महाविद्यालय तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आणि वारणा-कोडोली परिसर पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित केली होती. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील विविध वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या आणि डिजिटल माध्यमांशी संबंधित शंभरहून अधिक पत्रकारांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

यावेळी मार्गदर्शन करताना आमदार डॉ. विनय कोरे यांनी, एआय मुळे पत्रकारितेस नवीन क्षितिजे प्राप्त होतील, मात्र सत्यता, विश्वासार्हता आणि सामाजिक बांधिलकी ही मूल्ये जपणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले यांनी, पत्रकारिता आणि समाज यांचे अतूट नाते अधोरेखित करत बदलत्या काळात पत्रकारांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना विश्वासार्हता आणि वस्तुनिष्ठता जपली पाहिजे, असे मत व्यक्त केले.

कार्यशाळेचे प्रमुख तज्ज्ञ निलेश बहिरशेठ-जैन यांनी, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित विविध आधुनिक साधनांची प्रात्यक्षिके सादर केली. बातमी लेखन, भाषांतर, संपादन, व्हिडिओ निर्मिती, माहिती संकलन, ध्वनीचे मजकुरात रूपांतर आणि डिजिटल माध्यमांसाठी आशय निर्मिती यामध्ये एआयचा प्रभावी वापर कसा करता येतो, याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विलास कारजिन्नी, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. के. आय. पाटील, अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे यांनी मनोगत व्यक्त करत कृत्रिम बुद्धिमत्ता हा आता आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनला असल्याचे सांगितले.

समारोप सत्रात अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शिवराज काटकर, सहकार परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रताप पाटील, वारणा दूध संघाचे अध्यक्ष एच. आर. जाधव, संचालक शिवाजी जंगम, आदी उपस्थित होते. पत्रकार समन्वयक म्हणून संजय पाटील, दिलीप पाटील, प्रकाश मोहरेकर, कृष्णात जमदाडे, आनंदा वायदंडे, बाबा माने, बाबा कावळे यांनी काम पाहिले.