"मरण यावं तर कोल्हापूरात" ...
अंत्यसंस्कारानंतर उरणाऱ्या राखेचाही व्यवहार? महापालिका सभेत भ्रष्टाचाराच्या आरोपांनी खळबळ
कोल्हापूर : "मरण यावे तर कोल्हापुरच्या पंचगंगा स्मशानभूमीत" असे अभिमानाने म्हटले जाते. आधुनिक सुविधा, स्वच्छता आणि व्यवस्थापनामुळे पंचगंगा स्मशानभूमीची राज्यभर ओळख आहे. मात्र याच स्मशानभूमीतील अंत्यसंस्कारानंतर उरणाऱ्या राखेच्या व्यवस्थापनावर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोल्हापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत या राखेच्या विक्रीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होताच एकच खळबळ उडाली.
काँग्रेसचे नगरसेवक अमर समर्थ यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित करत स्मशानभूमीतील राख आणि शेणीच्या भुसा खरेदी-विक्री प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी केली. मृत व्यक्तींच्या अंत्यसंस्कारानंतर उरणारी राख ही शेतकऱ्यांसाठी उपयुक्त मानली जाते. त्यामुळे अनेक वर्षांपासून तिची मागणी आहे. मात्र याच राखेच्या वितरणात आर्थिक व्यवहार आणि नियमबाह्य निर्णय झाल्याचा आरोप आता पुढे आला आहे.
कोरोना काळात मोफत, नंतर टेंडर पद्धत...
कोरोना काळात पंचगंगा स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणावर अंत्यसंस्कार होत होते. त्या काळात निर्माण होणारी राख शेतकऱ्यांना थेट घेऊन जाण्याची मुभा देण्यात आली होती. त्यामुळे राखेची विल्हेवाटही लागत होती आणि शेतकऱ्यांनाही त्याचा उपयोग होत होता. मात्र नंतर ही पद्धत बदलली. राख वितरणासाठी निविदा प्रक्रिया लागू करण्यात आली. २०२१ ते २०२५ या कालावधीत राख कोणाला द्यायची, कोणत्या अटींवर द्यायची याचा अधिकार उपायुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे असल्याचे सभागृहात सांगण्यात आले. नगरसेवक अमर समर्थ यांनी उपस्थित केलेला मुख्य प्रश्न हाच होता. राखेच्या विक्रीचा किंवा वितरणाचा अधिकार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे असताना, संबंधित सॅनिटरी इन्स्पेक्टरने परस्पर निर्णय घेत व्यवहार केल्याचा आरोप त्यांनी केला. जर हा आरोप खरा असेल, तर प्रश्न केवळ राख विक्रीचा राहत नाही, तर महापालिकेच्या प्रशासकीय व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होते. अधिकार नसताना निर्णय कोणी घेतले? त्यातून आर्थिक लाभ कोणाला झाला? आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती होती का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
शेणीच्या भुसातही घोटाळ्याचा संशय...
सभागृहात केवळ राखेचाच मुद्दा उपस्थित झाला नाही, तर अंत्यसंस्कारासाठी वापरल्या जाणाऱ्या शेणीच्या भुसा खरेदी प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. या खरेदीत अनियमितता झाल्याचा आरोप करत अमर समर्थ यांनी संबंधित माहिती सभागृहात सादर करण्याची मागणी केली. मात्र संबंधित अधिकाऱ्यांकडे याबाबत तत्काळ माहिती उपलब्ध नसल्याने ते निरुत्तर झाल्याचे चित्र सभागृहात पाहायला मिळाले.
सभापतींचे चार दिवसांत अहवालाचे निर्देश ...
या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत सभापती विशाल शिराळे यांनी संबंधित विभागाकडून संपूर्ण माहिती गोळा करून चार दिवसांत सभासदांसमोर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच आरोपांची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही पुढे आली आहे.
भावनिक विषयातून प्रशासन अडचणीत...
स्मशानभूमी हा केवळ प्रशासकीय विषय नाही, तर तो समाजाच्या भावनांशी जोडलेला विषय आहे. ज्या ठिकाणी माणसाचा अंतिम प्रवास पूर्ण होतो, त्या ठिकाणच्या व्यवस्थापनावर भ्रष्टाचाराचे आरोप होणे ही गंभीर बाब मानली जात आहे. पंचगंगा स्मशानभूमी आजवर आदर्श व्यवस्थापनासाठी ओळखली जात होती. मात्र राखेच्या व्यवहारावरून निर्माण झालेल्या या वादामुळे महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आता चौकशीत नेमके काय समोर येते, संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका काय असते आणि आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे, याकडे कोल्हापूरकरांचे लक्ष लागले आहे.