कोल्हापुरात ६ जूनला 'शिवाजी कोण होता' पुस्तकाचे सामूहिक वाचन...५ हजार वाचकांचा सहभाग

<p>कोल्हापुरात ६ जूनला 'शिवाजी कोण होता' पुस्तकाचे सामूहिक वाचन...५ हजार वाचकांचा सहभाग</p>

कोल्हापूर -  शिवराज्यभिषेक दिनाचे औचित्य साधून कॉम्रेड गोविंद पानसरे लिखीत शिवाजी कोण होता, या पुस्तकाचे कोल्हापूरात सामूहिक वाचन आयोजित करण्यात आले आहे. या पुस्तकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा चिकीत्सक आणि लोकाभिमुख दृष्टिकोन समाजापर्यंत पोहोचावा, लोकांना इतिहासाकडे तर्कशुद्ध आणि समतावादी नजरेतून पाहण्याची प्रेरणा मिळावी. तसेच समाजात वाढत चाललेल्या द्वेषमूलक वातावरणाला वैचारिक उत्तर मिळावे. या हेतूने शनिवारी ६ जूनला दुपारी ४ वाजता बिंदू चौकात या पुस्तकाचे वाचन होणार आहे. विविध जाती, धर्म, विचार आणि सामाजिक स्तरातील तब्बल पाच हजार सजग वाचक या उपक्रमात सहभागी होणार असल्याची माहिती अनुसूचित जाती आरक्षण बचाव जनआंदोलन समिती कोल्हापूरच्यावतीने पत्रकार परिषेदत देण्यात आली.

या उपक्रमात मानवतावादी सांस्कृतिक चळवळ, समस्त पुरोगामी, परिवर्तनवादी, विज्ञाननिष्ठ, शिव, शाहू, फुले आंबेडकरवादी, मार्क्सवादी, आणि स्त्रीवादी विचारांच्या विविध संस्था, संघटना, राजकीय पक्ष  आणि सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. या उपक्रमात समस्त शिवप्रेमी, राजकीय पक्ष यांच्यासह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या पत्रकार परिषदेला आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, नगरसेवक दुर्वासबापू कदम, सुभाष देसाई, बाळासाहेब भोसले, सोमनाथ घोडेराव, सुभाष रामुगडे, रघुनाथ मांढरे, जी.बी. अंबपकर, अनिल म्हमाने, रमेश कांबळे, भिमराव कांबळे, दिपक कांबळे, जयसिंग पाडळीकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.