मुख्यमंत्र्यांनी एका व्यासपीठावर यावे; शक्तीपीठ महामार्गाची गरज पटवून द्यावी’- शेतकरी मेळाव्यात आमदार सतेज पाटील यांचे खुले आव्हान
९ जूनचा मोर्चा ऐतिहासिक ठरणार; शक्तीपीठविरोधात बोरवडेत रणशिंग
कागल : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलनाला आता अधिक धार प्राप्त झाली असून बोरवडे (ता. कागल) येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात महामार्ग रद्द करण्यासाठी एकमुखी निर्धार व्यक्त करण्यात आला. मेळाव्यात आमदार सतेज पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान दिले. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार के. पी. पाटील, विविध शेतकरी नेते आणि कार्यकर्त्यांनीही महामार्गाविरोधात आक्रमक भूमिका घेतली.
"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका व्यासपीठावर यावे आणि शक्तीपीठ महामार्गाची गरज काय आहे, हे जनतेला पटवून द्यावे. आम्ही हा महामार्ग का नको, याची कारणे मांडू. सरकारची भूमिका योग्य ठरली तर आम्ही राजकारणातून निवृत्ती घेण्यास तयार आहोत. मात्र आमची भूमिका स्पष्ट आहे. चर्चा नको, शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे. हा महामार्ग कोल्हापूरसह अनेक गावांना पुराच्या संकटात ढकलणार असून शेती व शेतीपूरक व्यवसायांवर गंभीर परिणाम होणार आहेत. ९ जूनचा मोर्चा हा राज्याच्या इतिहासात नोंद होईल असा काढणार आहोत," असा निर्धार आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला.
कागल तालुक्यातील एकोंडी गावातील शेतकऱ्यांनी सर्वप्रथम शक्तीपीठ महामार्गाविरोधात पुढाकार घेण्याची विनंती केल्यानंतर आपण या आंदोलनात सहभागी झाल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले. गारगोटी येथील सभेत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महामार्ग रद्द करण्याची घोषणा केली होती. आता तो शब्द पाळला जाणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
माजी खासदार राजू शेट्टी यांनी शक्तीपीठ महामार्गाची आवश्यकता नसताना सरकार तो शेतकऱ्यांवर लादत असल्याचा आरोप केला. महामार्गासाठी होणारा खर्च, ऊस उत्पादनावर होणारा परिणाम आणि शेती क्षेत्राचे नुकसान याकडे लक्ष वेधत त्यांनी हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली. "२१ हजार शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा सुरू आहे. ९ जूनचा मोर्चा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा मोर्चा ठरेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच कोणत्याही अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या जमिनींची मोजणी करू देऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले.
माजी आमदार के. पी. पाटील यांनी भुदरगड तालुक्यातील शेतकऱ्यांचा महामार्गाला तीव्र विरोध असल्याचे सांगितले. बागायती जमिनी संपुष्टात आल्यास साखर कारखाने अडचणीत येतील, तर अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहावर मोठा परिणाम होईल, असे त्यांनी नमूद केले. राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वजण एकत्र उभे राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
मेळाव्यात बोलताना बिद्री साखर कारखान्याचे संचालक राहुल देसाई यांनी कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांवर टीका करत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारमधील मंत्री मौन का बाळगत आहेत, असा सवाल उपस्थित केला.
सदाशिव चरपाले यांनी शक्तीपीठ महामार्गामुळे हजारो एकर सुपीक जमीन बाधित होणार असल्याचा दावा केला. शेतकऱ्यांच्या हितासाठी हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत हाणून पाडू, अशी भूमिका त्यांनी मांडली.
समन्वयक गिरीश फोंडे यांनी महामार्गामुळे पर्यावरणाची हानी होणार असल्याचा आरोप करत हा प्रकल्प काही उद्योगसमूहांच्या हितासाठी राबविला जात असल्याचा दावा केला.
शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अजित पाटील यांनी शेतकऱ्यांनी एकजूट ठेवून आंदोलन अधिक व्यापक करण्याचे आवाहन केले.
शिवसेना ठाकरे गट सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनी जिल्ह्यात आधीच रस्त्यांचे जाळे उपलब्ध असताना नव्या महामार्गाची गरज काय, असा सवाल उपस्थित केला. विविध लोकप्रतिनिधींनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे, अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, ९ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. शक्तीपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा निर्धार मेळाव्यात व्यक्त करण्यात आला.
यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार के. पी. पाटील, जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजयराव देवणे, मनोज फराकटे, श्रीमती शोभाताई फराकटे, बालाजी फराकटे, सरपंच जयश्री फराकटे, मनोज फराकटे, कॉ. गिरीश फोंडे, कॉ. सम्राट मोरे, हिंदुराव चौगले, पी. डी. धुंदरे, सदाशिवराव चरापले, अजित पवार अभिजीत तायशेटे, रणधीर मोरे, शशिकांत पाटील, बाबासाहेब चौगले, प्रकाश पाटील, डी. एस. पाटील, एस. बी. पाटील, जीवन पाटील, शामराव देसाई, श्रीपती पाटील, सचिन घोरपडे, सर्जेराव घोरपडे, सर्जेराव देसाई, एच. आर. पाटील, सुभाष पाटील, रघुनाथ कुंभार, संभाजी फराकटे, संजय सरदेसाई,वैभव तहसिलदार, विक्रम पाटील, रणजीत पाटील, सचिन झंवर यांच्यासह शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समितीचे पदाधिकारी. बाधित शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.