शेअर मार्केटमधून तब्बल सव्वा दोन कोटींची फसवणूक...इचलकरंजीतील घटना

<p>शेअर मार्केटमधून तब्बल सव्वा दोन कोटींची फसवणूक...इचलकरंजीतील घटना</p>

इचलकरंजी – इचलकरंजी शहरात शेअर मार्केटमधून तब्बल सव्वा दोन कोटींची फसवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

शहरातील आयकॉन पार्क परिसरात राहणाऱ्या मोहसिन कादर मणेर याने त्याचा सहकारी मुदस्सर जमीर मकानदार याला सोबत घेऊन शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा आठ टक्के नफा मिळेल, असे सांगून इचलकरंजीतील गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला. सुरुवातीच्या काळात काही गुंतवणूकदारांना परतावा देऊन गुंतवणूकदारांचा विश्वास अधिक दृढ केला. त्यानंतर अधिकाधिक लोकांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम जमा करून घेण्यात आल्या. सन २०२२ ते २५ डिसेंबर २०२५ या कालावधीत एकूण ४८ गुंतवणूकदारांकडून मणेर याने रोख, ऑनलाईन व्यवहार, आरटीजीएस आणि धनादेशाद्वारे एकूण २ कोटी २५ लाख ५७ हजार ९७२ रुपयांची गुंतवणूक करुन घेतली. त्यानंतर मुदत संपल्यानंतरही गुंतवलेली रक्कम अथवा आश्वासित परतावा न मिळाल्याने गुंतवणूकदारांनी मणेरकडे वारंवार पाठपुरावा केला. पैसे परत मागण्याचा तगादा लावताच मणेर टाळाटाळ करु लागला. त्यानंतर मणेरने कार्यालय बंद ठेवत डिसेंबर २०२५ मध्ये आपल्या कुटुंबासह इचलकरंजीतून पळ काढला. इचलकरंजीतील रियल इस्टेट एजंट चंद्रकुमार शिरगुप्पे यांनी मोहसीन मणेर आणि त्याचा साथीदार मुदस्सर मकानदार या दोघां विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणूकीची तक्रार दाखल केली. या मणेर आणि मकानदार यांनी अठेचाळीस गुंतवणूकदारांची सुमारे सव्वा दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड अधिक तपास करत आहेत.