'कॅसिनो' व्हिडिओवरून कोल्हापूरच्या राजकारणात खळबळ
नगरसेवक ऋतुराज क्षीरसागरांवर गंभीर आरोप ; 'नैतिक जबाबदारी स्वीकारून आ. राजेश क्षीरसागरांनी राजीनामा द्यावा' : रविकिरण इंगवले
कोल्हापूर - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले यांनी केलेल्या आरोपांवरून कोल्हापूरच्या राजकारणात खळबळ उडालीय. इंगवले यांनी पत्रकार परिषदेत आमदार राजेश क्षीरसागर आणि त्यांचे पुत्र, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप करत नैतिकतेचा मुद्दा उपस्थित करत राजीनाम्याची मागणी केली. यावेळी त्यांनी एका कॅसिनोतील व्हिडिओ दाखवत ऋतुराज क्षीरसागर जुगार खेळताना दिसत असल्याचा दावा केलाय.
दैवज्ञ बोर्डिंग येथे झालेल्या पत्रकार परिषदेत इंगवले यांनी थेट आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर निशाणा साधत, "लोकप्रतिनिधी हे समाजाचे आदर्श असतात. त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या वर्तनातून चुकीचा संदेश जात असेल, तर त्याची नैतिक जबाबदारी संबंधित लोकप्रतिनिधींनी स्वीकारली पाहिजे," असे त्यांनी म्हटलंय.
'नैतिकतेचा प्रश्न अधिक महत्त्वाचा' -
इंगवले यांनी दावा केला की, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांचा व्हिडिओ हा केवळ एका व्यक्तीचा विषय नसून, तो सार्वजनिक जीवनातील नैतिकतेशी संबंधित प्रश्न आहे. "तरुण पिढी व्यसन, जुगार आणि मटका यांसारख्या गैरप्रकारांच्या विळख्यात अडकत असताना लोकप्रतिनिधींच्या कुटुंबीयांबाबत अशा चर्चा होणे दुर्दैवी आहे," असे ते म्हणाले. त्यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांनी या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.
कोल्हापूरच्या कायदा-सुव्यवस्थेवरही प्रश्न -
पत्रकार परिषदेत इंगवले यांनी केवळ क्षीरसागर कुटुंबीयांवरच नव्हे, तर शहरातील कायदा-सुव्यवस्था आणि पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही टीका केली. कोल्हापूरमध्ये गांजा, मटका, बेटिंग आणि इतर बेकायदेशीर प्रकार वाढत असल्याचा आरोप करत त्यांनी पोलिस प्रशासन याकडे पुरेसे गांभीर्याने पाहत नसल्याचा दावा केला.
विकास कामांवरूनही टीका -
महानगरपालिका, शहरातील विकासकामे आणि निवडणूक प्रक्रियेतील विविध मुद्द्यांवरूनही इंगवले यांनी सत्ताधारी गटावर हल्लाबोल केला. काही निवडणुकांमध्ये ईव्हीएमबाबत शंका उपस्थित करत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
दरम्यान, पत्रकार परिषदेत करण्यात आलेल्या आरोपांबाबत नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांनी प्रतिक्रिया देताना, पत्रकार बैठकीत दाखवलेल्या व्हिडीओ वर कायदेतज्ञांचा सल्ला घेवून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणार असल्याचं सांगितलंय.