शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर कोल्हापुरात आढावा मेळावा

 

कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर शिक्षकांच्या समस्या मांडल्या

<p>शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर कोल्हापुरात आढावा मेळावा</p>

<p> </p>

कोल्हापूर  : कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज सभागृह येथे कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थांच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी विशेष आढावा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. आमदार जयंत आसगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडला.

शिक्षण उपसंचालक कार्यालय, शिक्षणाधिकारी कार्यालय तसेच शिक्षण विभागाकडे प्रलंबित असलेल्या विविध प्रस्ताव व प्रश्नांच्या निर्गतीकरणासाठी संबंधित अधिकाऱ्यांसोबत थेट चर्चा करण्याच्या उद्देशाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. संस्था स्तरावरील प्रश्न, शिक्षकांचे वैयक्तिक प्रश्न तसेच शासनाच्या शैक्षणिक धोरणांशी संबंधित प्रलंबित बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीत अनुकंपा नियुक्ती प्रस्तावांना मान्यता, शिक्षकांचे समायोजन, वरिष्ठ व निवड श्रेणी मंजुरी, वैद्यकीय बिले, वैयक्तिक मान्यता, वेतनश्रेणीतील फरक तसेच हॉस्पिटल बिलांशी संबंधित प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. अनेक शिक्षकांनी आपल्या प्रलंबित प्रकरणांबाबत थेट अधिकाऱ्यांसमोर प्रश्न मांडले. यावेळी शिक्षकांमध्ये नाराजीचे सूर उमटल्याचे दिसून आले.

यावेळी आमदार जयंत आसगावकर यांनी आभाकार्ड योजनेबाबत चिंता व्यक्त केली. आभा कार्ड अंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंत वैद्यकीय लाभ उपलब्ध होत असला तरी त्यामुळे शिक्षकांची वैद्यकीय बिले मंजूर होण्यात अडचणी येत असल्याची बाब त्यांनी उपस्थित केली. हा लाभ प्रत्यक्षात एका व्यक्तीपुरता मर्यादित राहत असल्याने कुटुंबातील इतर सदस्यांच्या वैद्यकीय गरजांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या विषयावर शासनाकडे पाठपुरावा करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांची तातडीने सोडवणूक करून संबंधित प्रस्तावांना गती द्यावी, अशी मागणी यावेळी मुख्याध्यापक संघाच्या वतीने करण्यात आली.

बैठकीस आमदार जयंत आसगावकर, शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, साताराचे शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांच्यासह  तिन्ही जिल्ह्यांतील पे-युनिट अध्यक्ष व संबंधित अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 शिक्षक नेते एस. डी. लाड, मुख्याध्यापक संघाचे चेअरमन राहुल पवार, दादा लाड, भरत रसाळे, खंडेराव जगदाळे, बी. जी. बोराडे, सचिन नलवडे, अशोक थोरात, शारंगधर देशमुख, बाबा पाटील, सुरेश संकपाळ, व्ही. जी. पवार, विजय जाधव, के. के. पाटील, उदय पाटील, अंजली जाधव, सुधीर जाधव, राजेंद्र कोरे यांच्यासह संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.