गोकुळ निवडणूकीच्या संदर्भात झालेल्या बैठकीवरून महायुतीमध्ये वाद

"मला डावलून इतरांना निमंत्रण का?" ; आमदार शिवाजी पाटलांचा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्लाबोल

<p>गोकुळ निवडणूकीच्या संदर्भात झालेल्या बैठकीवरून महायुतीमध्ये वाद</p>

कोल्हापूर : आगामी गोकुळ दूध संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांची झालेली बैठक आता नव्या राजकीय वादाचे कारण ठरली आहे. या बैठकीसाठी आपल्याला निमंत्रित करण्यात आले नसल्याची खंत व्यक्त करत चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. त्यांच्या आरोपांमुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद आणि भाजपमधील धुसफूस पुन्हा एकदा उघड झाली आहे.

गोकुळ निवडणुकीसाठी महायुतीची बैठक -
गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीसंदर्भात महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. गोकुळच्या सत्तासमीकरणांच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची मानली जात असताना, या बैठकीतून आपल्याला जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आल्याचा आरोप आमदार शिवाजी पाटील यांनी केला. बैठकीबाबत नाराजी व्यक्त करताना शिवाजी पाटील म्हणाले, "गोकुळच्या निवडणुकीशी प्रत्यक्ष संबंध नसलेल्या व्यक्तींना बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले. मात्र चंदगड, आजरा, गडहिंग्लज भागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मला बैठकीला बोलावले नाही."

"सुजित कदमांचा गोकुळशी काय संबंध?" -
शिवाजी पाटील यांनी आमदार विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुजित कदम यांच्या उपस्थितीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "कोल्हापुरातील गोकुळच्या बैठकीला सुजित कदमांना बोलावलं जातं, पण मला का बोलावलं नाही? त्यांचा गोकुळशी काय संबंध आहे?" असा सवाल त्यांनी केला.

मंत्री चंद्रकांत पाटलांवर थेट आरोप -
शिवाजी पाटील यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वशैलीवरही टीका केली. भाजपच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप करत त्यांनी पक्ष संघटनेत नाराजी असल्याचे म्हटले. "भाजपमधील कोणत्याही कार्यकर्त्याला त्यांनी कधीच विश्वासात घेतले नाही. कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेतल्या जात नाहीत. त्यामुळे पक्षात अस्वस्थता निर्माण झाली आहे," असा आरोप त्यांनी केला. "मंत्री चंद्रकांत पाटील हे मंत्री हसन मुश्रीफ यांना सोबत घेऊन भाजप संपवायला निघाले आहेत." असा हल्लाबोल केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

"चंदगडसाठी काय केलं?" -
चंदगड मतदारसंघाच्या विकासाच्या मुद्द्यावरूनही त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला. "मंत्री म्हणून त्यांनी चंदगडसाठी नेमकं काय केलं?" असा सवाल उपस्थित करत त्यांनी विकासकामांबाबत नाराजी व्यक्त केली.

शेतकरी कुटुंबांच्या प्रतिनिधित्वाचा मुद्दा -
गोकुळच्या व्यवस्थापनात सर्वसामान्य शेतकरी कुटुंबांना संधी मिळत नसल्याचा आरोप करत त्यांनी , "शेतकऱ्यांचा मुलगा संचालक होतो का? शेतकरी कुटुंबातील मुलांनी मग कुठे जायचं?" असा प्रश्न केला.

मुख्यमंत्री फडणवीसांविषयी आदर, पण नाराजी कायम -
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आदर व्यक्त करताना शिवाजी पाटील म्हणाले, "मुख्यमंत्री हे माझे नेते आहेत. त्यांनी दिलेला आदेश मी मान्य करतो. मात्र महायुतीच्या बैठकीसाठी मला निमंत्रित करण्यात आले नाही, याचे दुःख आहे." आपली भूमिका स्पष्ट करताना त्यांनी सांगितले, "मी चांगलं काम करून निवडून येईन; मात्र लाचार होऊन जगणार नाही."

"गोकुळमध्ये चंदगडचा हक्क सोडणार नाही" -
गोकुळच्या राजकारणात चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यांचे प्रतिनिधित्व कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त करत त्यांनी स्पष्ट केले, "गोकुळमध्ये चंदगडचा हक्क आम्ही सोडणार नाही."

गोकुळच्या निमित्ताने जुने मतभेद पुन्हा ऐरणीवर -
राजकीय वर्तुळात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपासून चंद्रकांत पाटील आणि शिवाजी पाटील यांच्यात मतभेद असल्याची चर्चा होती. मात्र गोकुळ निवडणुकीसाठी झालेल्या महायुतीच्या बैठकीमुळे हे मतभेद प्रथमच इतक्या उघडपणे समोर आले आहेत.

महायुतीत सर्व काही आलबेल? -
गोकुळ दूध संघ हा कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय सत्तासमीकरणांचा केंद्रबिंदू मानला जातो. त्यामुळे गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील नेत्यांमध्येच निर्माण झालेला हा वाद आगामी राजकारणावर परिणाम करणारा ठरू शकतो. त्यामुळे गोकुळच्या बैठकीतून उघड झालेली ही नाराजी केवळ निमंत्रणापुरती मर्यादित नसून महायुतीतील अंतर्गत अस्वस्थतेचे संकेत मानले जात आहेत.