प्रश्न विचारणाऱ्यांना पाकिस्तानी म्हणणार आहे का? : अभिजित दिपकेंचा मोदी सरकारला सवाल
छत्रपती संभाजीनगर - ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP)चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी काल दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन केल्यानंतर ते आज आपल्या गावी छत्रपती संभाजीनगरमध्ये परतले आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना अभिजीत दिपके यांनी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे अशी मागणी करून त्यांनी प्रधान यांना ७ दिवसांची मुदत दिली आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी सात दिवसात राजीनामा न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करू, असा इशारा देत त्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी जोडले जाणार नाही असे म्हणत अभिजीत दिपके यांनी, सरकारला प्रश्न विचारणारे सगळे पाकिस्तानी आहेत का ?,प्रश्न विचारणाऱ्यांना भाजप पाकिस्तानी म्हणणार आहे का? असं कोणाकोणाला म्हणणार आहे ? म्हणजे भाजप आणि आयटीवालेच भारतीय आहेत का? हे कधीपर्यंत चालणार आहे ? असे प्रश्न करत ,तुम्ही व्यवस्थित काम केलात तर आम्हाला प्रश्न विचारण्याची गरज कशाला पडते असं त्यांनी म्हटलंय . जर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रशिया – युक्रेनचे युद्ध थांबवण्याची भाषा करतात तर नीट पेपर फुटी का थांबवू शकत नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.