कसबा वाळवेतील दूधगंगा नदीवरील बंधारा वाहतुकीसाठी बंद...पर्यायी मार्गाअभावी नागरिकांचे हाल...

<p>कसबा वाळवेतील दूधगंगा नदीवरील बंधारा वाहतुकीसाठी बंद...पर्यायी मार्गाअभावी नागरिकांचे हाल...</p>

कोल्हापूर - राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथील दूधगंगा नदीवरील पूल गेल्या बारा वर्षापासून सुरू आहे. पुलाचे कासगतीने सुरू असलेले हे काम बावीसहून अधिक गावांना पुरस्थितीत डोकदुखी ठरत आहे. त्यामुळे येथील सर्व वाहतूक कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरून सुरु असते. या बंधाऱ्याच्या दुरूस्तीसाठी या मार्गावरील सर्व वाहतूक बंद करण्यात आली आहे. गेल्या सात वर्षाच्या कालावधीत या बंधाऱ्यावर दोन वेळा दुरुस्ती करण्यात आली होती. तरीही पुन्हा एकदा बंधाऱ्याच्या दुरुस्तीची वेळ आल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. बंधारा बंद झाल्यामुळे केवळ पाच ते सहा किलोमीटर अंतरासाठी आता नागरिकांना तब्बल ३६ ते ४० किलोमीटरचा वळसा घालावा लागत आहे. यामुळे वेळ, इंधन आणि खर्चात मोठी वाढ झाली असून दैनंदिन कामाचे नियोजन कोलमडत आहे.

विशेषतः शेतकरी, दूध उत्पादक, विद्यार्थी, कामगार आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कसबा वाळवे हे परिसरातील प्रमुख आर्थिक केंद्र मानले जाते. याठिकाणी बँका, पोस्ट कार्यालय, बाजारपेठ तसेच विविध शासकीय सेवा उपलब्ध असल्याने दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा सुरू असते. बंधारा बंद झाल्याने पेन्शनधारक, महिला लाभार्थी, औद्योगिक वसाहतीतील कामगारांनाही मोठा फटका बसत आहे. दररोज दूध वाहतूक करणाऱ्या दुग्ध व्यवसायिक शेतकऱ्यांचीही मोठी गैरसोय होत आहे. वारंवार होणाऱ्या दुरुस्त्या, कोट्यवधींचा खर्च आणि तरीही कायम राहणाऱ्या समस्या यामुळे हा बंधारा विकासाचा नव्हे तर निधी मुरवण्याचा राजमार्ग ठरत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे. प्रशासनाने पर्यायी रस्त्याची व्यवस्था करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.