कबनुरात पत्नी आणि दोन मुलांकडून जन्मदात्या पित्याचा खून...

<p>कबनुरात पत्नी आणि दोन मुलांकडून जन्मदात्या पित्याचा खून...</p>

इचलकरंजी – शहरानजीकच्या कबनूरमध्ये पत्नी आणि दोन मुलांनी मिळून जन्मदात्या पित्याचा खून केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.  

इचलकरंजी नजीकच्या कबनूरमधील शिवाजी चौक, फॅक्टरी रोड परिसरात माजी सैनिक बाळू बामणे हे कुटुंबासह राहत होते. बामणे हे सैन्य दलातून सेवानिवृत्त झाले होते ते गेल्या अनेक वर्षांपासून व्यसनाच्या आहारी गेले होते. रोज मद्यप्राशन करून ते पत्नी तसेच यश आणि ओम या दोन मुलांना मारहाण करायचे. ७ मे रोजी रात्रीच्या सुमारास बामणे यांनी दारूच्या नशेत घरी येऊन पत्नीशी वाद घातला. वादानंतर बामणे यांनी पत्नीला मारहाण केली. यावेळी आईला होत असलेली मारहाण पाहून संतप्त झालेल्या मुलांनी वडिलांना विरोध केला. यावेळी घरात मोठा वाद निर्माण झाला. रागाच्या भरात पत्नी आणि दोन मुलांनी मिळून त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या पाठीवर धारदार चाकूने वार केल्याने ते गंभीर जखमी झाले. यावेळी पत्नी आणि दोन मुलांनी ते इमारतीवरुन पडल्याचा बनाव केला. घटनेनंतर पत्नी आणि मुलांनी जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र बामणे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांना बामणे यांच्या शरीरावर जखमा दिसल्याने त्यांना संशय आला त्यांनी याबाबत शिवाजीनगर पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला. तपासादरम्यान घरात रक्ताचे डाग, धारदार चाकू तसेच काही महत्त्वाचे पुरावे आढळून आले. यावेळी पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर मुलांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी यश आणि ओम बामणे या दोघा मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पत्नीचीही चौकशी सुरू आहे. शिवाजीनगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.