कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या २८७ प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीसाठी ८४ कोटींचा निधी मंजूर...

<p>कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या २८७ प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीसाठी ८४ कोटींचा निधी मंजूर...</p>

कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्हा नियोजन आणि विकास समितीकडे समृद्धी शाळांचा आराखडा सादर केला होता. या अंतर्गत ८४ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. कोल्हापूर जिल्हा परिषदेंतर्गत एकूण १ हजार ९५६ प्राथमिक शाळा आहेत. यातील अनेक जुन्या शाळांच्या छताला गळती, भिंतींची पडझड, स्वच्छतागृहांची दुरावस्था झाली आहे. अशा २८७ शाळांची दुरुस्ती करण्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे. यातील काही शाळांच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे, तर काही शाळांचे काम अंतिम टप्प्यात आहे. या सर्व शाळांना आणि संबंधित ठेकेदारांना पावसाळ्याच्या आधी म्हणजेच मे महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर शिक्षण विभागाला मिळालेला हा आजवरचा सर्वात मोठा निधी असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर मीना शेंडकर यांनी दिली आहे.

तालुका निहाय विचार केला तर करवीर तालुक्यातील ४३ शाळा, हातकणंगले ३६, शिरोळ ३६, कागल ३५, राधानगरी २९, शाहूवाडी २२, भुदरगड २०, गडहिंग्लज १९, चंदगड १७, पन्हाळा ११ आणि गगनबावडा ८ अशा एकूण २८७ शाळांचा यात समावेश आहे. या शाळांमध्ये इमारतींची दुरुस्ती, छप्पर दुरुस्ती, वर्ग खोल्यांचे मजबुतीकरण, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छता गृहांची सुधारणा आदी कामी केली जाणार आहेत. यामुळे येत्या शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीला अनेक शाळांचे रुपडे पालटणार आहे.