पश्चिम बंगालमध्ये भाजप नेत्याच्या स्वीय सहाय्यकाची गोळ्या घालून हत्या...
कोलकत्ता – नुकताच पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. यावेळी बंगालच्या जनतेने सत्ता बदल करून तृणमूलच्या ममता बनर्जींना मोठा धक्का दिला आहे. याची चर्चा एकीकडे असताना मोठ्या मतांनी विजय झालेले भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक (PA) चंद्रनाथ रथ यांची काल रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
कोलकात्याच्या बाह्य भागात मध्यमग्राममधील दोहरिया परिसरात चंद्रनाथ रथ हे एका कारमधून प्रवास करत असताना, दुचाकींवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांची गाडी अडवली आणि अगदी जवळून त्यांच्यावर गोळीबार केला. अत्यंत गंभीर अवस्थेत त्यांना तातडीने एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. भाजप नेत्या किया घोष यांनी, हा हल्ला राजकीय वैमनस्य आणि सूडबुद्धीने प्रेरित होऊन केल्याचा आरोप केला आहे.
पोलीस महासंचालक सिद्धनाथ गुप्ता यांनी सांगितले की, "आम्ही तपास सुरू केला असून गुन्ह्यात वापरलेली गाडी जप्त केली आहे. या गाडीची नंबर प्लेट बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. घटनास्थळावरून रिकामी काडतुसे आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे."