बसधारकांना ई-चलनद्वारे आकारला जाणारा दंड माफ करावा : कोल्हापूर जिल्हा बस मालक संघटनेची मागणी

<p>बसधारकांना ई-चलनद्वारे आकारला जाणारा दंड माफ करावा : कोल्हापूर जिल्हा बस मालक संघटनेची मागणी</p>

कोल्हापूर -  पुणे ते मुंबई द्रुतगती महामार्गावर रोज कोल्हापुरातील सव्वाशे बसेस ये - जा करत असतात. या मार्गावर प्रत्येक चार किलोमीटरला वेग मोजणारे कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे या मार्गावर परिवहन विभागाकडून ई चलनद्वारे बसेसचा ३५ किलोमीटर आणि ४० किलोमीटर पेक्षा जास्त वेग असेल तर चार हजार रुपयांचा दंड, यासह टोल नाक्यावर मार्ग बदलला तर दोन हजार रुपयांचा दंड

आहे. यामुळे एका बसवर साधारणपणे वार्षिक पाच लाख रुपयांचा दंड होतो. या विरोधात आमदार सतेज पाटील आणि आमदार जयंत पाटील यांनी अधिवेशनात आवाज उठवला होता. मात्र शासनाने याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे सरकारने ही लूट थांबवावी, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा बस मालक संघटनेने केली आहे. जर याची दखल घेतली नाही तर नाकोडा ट्रॅव्हल्सचे प्रदीप राठोड यांनी आरटीओ कार्यालयाबाहेर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे.  

यावेळी बोलताना शेफाली ट्रॅव्हल्सचे सतीशचंद्र कांबळे यांनी, २०१९ मध्ये ई चलन दंडाला सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्र राज्यात २०२५ अखेर सात हजार दोनशे कोटी पेक्षा अधिक दंड बसेसवर लावण्यात आला आहे. त्यातील दोन हजार सहाशे कोटीहून अधिक वसूल करण्यात आला आहे, तर चार हजार सहाशे कोटीपेक्षा अधिक दंड थकीत असल्याची माहिती त्यांनी दिली. ई चलन कायद्यांतर्गत गुजरात सरकारने २५ ते ९० टक्के कपात केली आहे. उत्तराखंड आणि कर्नाटक राज्यामध्ये सुद्धा दंडात कपात करण्यात आली आहे. मग महाराष्ट्र सरकारकडे मानवी दृष्टिकोन आहे की नाही ?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. यावेळी मनोज चौगुले, अशोक शिंदे, पंकज त्रिपाठी, शाकीर तहसीलदार, सुनील मगदूम, राजू ढाले आदी उपस्थित होते.