माजी नगरसेवकाच्या हॉटेलवर पोलिसांचा छापा; वेश्या व्यवसाय प्रकरणी लाखोंचा मुद्देमाल जप्त

<p>माजी नगरसेवकाच्या हॉटेलवर पोलिसांचा छापा; वेश्या व्यवसाय प्रकरणी लाखोंचा मुद्देमाल जप्त</p>

कोल्हापूर - शाहूपुरी पोलीस ठाणे आणि अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाने बुधवारी दुपारी केलेल्या धडक कारवाईत कोल्हापूर महापालिकेच्या माजी नगरसेवकाशी संबंधित हॉटेलमध्ये सुरू असलेला कथित वेश्या व्यवसाय उघडकीस आला. या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडालीय.

सदर बाजार परिसरातील गवळी गल्ली येथील ‘चारकोल’ हॉटेल इमारतीवर पोलिसांनी छापा टाकला असता, महिलांना पैशाचे आमिष दाखवून ग्राहकांकडे पाठविण्याचा प्रकार सुरू असल्याचे समोर आले. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान किसन पांडुरंग कांबळे (रा. पांगीरे, ता. चिकोडी) व वसिम रफिक मोमीन उर्फ विकास (रा. सरनोबतवाडी, ता. करवीर) यांना ताब्यात घेण्यात आले असून ‘दत्ता’ नावाचा एजंट फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली.

तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून, ग्राहकांकडून प्रत्येकी पाच हजार रुपये घेऊन महिलांना लॉजवर पाठविले जात होते. त्यातील काही रक्कम महिलांना देऊन उर्वरित पैसे आरोपी व एजंटांमध्ये वाटले जात असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या कारवाईत पोलिसांनी एक चारचाकी वाहन, दोन मोबाईल व रोख रक्कम असा तब्बल 4 लाख 24 हजार 695 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.

विशेष म्हणजे, ज्या हॉटेलमध्ये हा प्रकार सुरू होता त्या हॉटेलचा संबंध कोल्हापूर महापालिकेच्या एका माजी नगरसेवकाशी असल्याची चर्चा शहरात रंगली असून, या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळातही खळबळ उडालीय. पोलिसांकडून हॉटेल मालकाची भूमिकाही तपासली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष डोके करीत असून, कारवाई पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव यांच्या पथकानं केली.