इचलकरंजीत गटारीच्या कामावरुन नागरिकांचा संताप...ठेकेदार अन् अधिकाऱ्यांना धरलं धारेवर
इचलकरंजी - शहरातील प्रभाग क्रमांक १३ मधील घोडकेनगरातील विविध गल्ल्यांमध्ये सध्या गटारींचे काम सुरू आहे. मात्र या कामाबाबत अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. मंजूर आराखडा आणि तांत्रिक निकषांनुसार काम होत नसून निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून नियमबाह्य पद्धतीने काम सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
गटारींची खोली, रुंदी आणि सिमेंट काँक्रिटचे प्रमाण मंजूर अंदाजपत्रकानुसार नसल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. आज परिसरातील नागरिकांनी एकत्र येत कामाच्या ठिकाणी जाऊन ठेकेदार आणि महापालिका अधिकाऱ्यांना जाब विचारला. करदात्यांच्या पैशातून होणारी कामे दर्जेदार झाली पाहिजेत. निकृष्ट काम कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.
या कामाची तातडीने चौकशी करून संबंधित ठेकेदार तसेच संपूर्ण कामाची तांत्रिक तपासणी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, महापालिका अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत कामाची पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.